बेळगाव लाईव्ह : खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर आणि माहिती व जनसंपर्क विभागाचे आयुक्त हेमंत निंबाळकर यांचा सुपुत्र मल्हार हेमंत निंबाळकर याने अमेरिकेतील यूसी डेव्हिस विद्यापीठातून एकाच वेळी दोन पदव्या मिळवून कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
मल्हारने अर्थशास्त्रामध्ये ‘बॅचलर ऑफ आर्ट्स’ आणि सांख्यिकीमध्ये ‘बॅचलर ऑफ सायन्स’ अशा दुहेरी पदव्या संपादन केल्या आहेत. कॅलिफोर्नियातील सॅक्रॅमेन्टो येथील गोल्डन १ सेंटरमध्ये पार पडलेल्या दिमाखदार पदवीदान समारंभात त्याला हे यश मिळाले.
विशेष म्हणजे, या समारंभात मल्हार निंबाळकरने भारतीय संस्कृतीची ओळख असलेला कुर्ता आणि धोती परिधान करून कुलगुरूंचे ‘नमस्ते’ असे म्हणत स्वागत केले, ज्यामुळे भारतीय परंपरेचे सुंदर दर्शन घडले.

आपल्या मुलाच्या या प्रभावी यशाबद्दल माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर आणि माहिती व जनसंपर्क विभागाचे आयुक्त हेमंत निंबाळकर यांनी प्रचंड आनंद व्यक्त केला आहे.
हेमंत निंबाळकर यांनी सांगितले की, अमेरिकेत वैद्यकीय पदवी घेण्याचे त्यांच्या आजोबांचे स्वप्न होते, जे आता मल्हारने पूर्ण केले आहे. डॉ. अंजली निंबाळकर यांनीही मल्हारच्या या कामगिरीबद्दल त्याचे भरभरून कौतुक केले. या पदवीदान सोहळ्याला डॉ. अंजली आणि हेमंत निंबाळकर यांची कन्याही उपस्थित होती.


