बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज बेळगावमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुक्केरी तालुक्यातील इंगळगी येथे श्रीराम सेना कार्यकर्त्यांना झाडाला बांधून मारहाण केल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “त्या घटनेची पार्श्वभूमी वेगळी आहे. हा श्रीराम सेना किंवा मुस्लिम युवकांमधील वाद नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.”
बेळगावातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून सुरू असलेल्या आरोपांवर जारकीहोळींनी जोरदार प्रत्युत्तर दिले. “राजकारणात आरोप-प्रत्यारोप होणे स्वाभाविक आहे. सर्व अधिकाऱ्यांनी किमान चार वर्षे सेवा करावी, अशी आमची इच्छा आहे. एका वर्षात कोणत्याही अधिकाऱ्याची बदली करण्याची प्रथा आमच्याकडे नाही,” असे ते म्हणाले. दिल्लीत अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही किंवा पक्षात कोणताही असंतोष नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. “आम्ही स्वतःला लोकसेवक मानतो आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या हा गंभीर विषय नाही,” असे त्यांनी नमूद केले. याव्यतिरिक्त, बैलाहोंगल एसीने सरकारी जमीन खासगी केल्याच्या मुद्द्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
केंद्राकडून राज्याच्या करातील वाटा परत मिळण्याच्या मागणीवर बोलताना, मुख्यमंत्र्यांनी राज्याने केंद्राला दिलेल्या करातील किमान ५० टक्के वाटा राज्याला परत मिळावा, असे म्हटले असल्याचे त्यांनी सांगितले. महानगरपालिकेला निधी मिळत नसल्याच्या प्रश्नावर, सरकार टप्प्याटप्प्याने निधी देत असल्याचे जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. तसेच, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

काँग्रेसचे राज्य प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला यांच्या बेंगळुरू भेटीसंदर्भात विचारले असता, ते आमदारांच्या नाराजीवर किंवा इतर विषयांवर चर्चा करू शकतात, असे त्यांनी सांगितले. सुरजेवाला समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आमदार राजू कागे यांनी सिंचन प्रकल्पांसाठी निधी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केल्याचे त्यांनी मान्य केले. मंत्री के. एन. राजण्णा यांच्या ‘क्रांती होईल’ या वक्तव्यावर ‘त्यांनाच विचारले पाहिजे’ असे जारकीहोळी म्हणाले.
सवदत्ती यल्लम्मा क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने १०० कोटी रुपये निधी दिला असतानाही आपल्याला विचारात घेतले जात नाही, या खासदार जगदीश शेट्टर यांच्या आरोपाला उत्तर देताना जारकीहोळी म्हणाले, “खासदार जगदीश शेट्टर हे प्राधिकरणाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना बैठकांना आमंत्रित केले जात नाही. समिती स्थापन झाल्यानंतर निधी देण्यात आला आहे. जर ते आधीपासूनच समिती सदस्य असते, तर त्यांना सदस्यत्व दिले असते.” असेही जारकीहोळींनी नमूद केले.


