बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील भुईकोट किल्ल्याजवळून गांधीनगर सांबऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या दुपदरी रस्त्यावर मधे दुभाजकाच्या वळणाच्या ठिकाणी बॅरिकेड्स घातल्यामुळे वाहन चालकांची मोठी गैरसोय होत असून हे बॅरिकेड्स तात्काळ हटवण्याची मागणी केली जात आहे.
भुईकोट किल्ल्यासमोरील सम्राट अशोक चौकाजवळून गांधीनगर सांबऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या दुपदरी रस्त्यावरील दुभाजक पूर्वी मधे ठराविक अंतरावर खुला ठेवण्यात आला होता.
त्यामुळे गांधीनगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांना वळण घेऊन माघारी फिरणे सोयीचे जात होते. मात्र अलीकडे रहदारी पोलिसांकडून दुभाजकाच्या त्या वळणाच्या ठिकाणी बॅरिकेड्स घालून रस्ता बंद करण्यात आला आहे.

परिणामी अचानक आठवलेल्या तातडीच्या कामासाठी माघारी फिरू इच्छिणाऱ्या वाहन चालकांना दूरवर जाऊन परत शहराच्या दिशेने यावे लागत आहे. त्यामुळे वेळेचा अपव्यय तर होतच आहे शिवाय पुढील वळणाच्या ठिकाणी वाहनांची एकच गर्दी होत असल्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची नोंद घेऊन पूर्वीप्रमाणे दुभाजकाच्या ठिकाणी रस्ता खुला ठेवावा, अशी जोरदार मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.


