बेळगाव लाईव्ह | रामलिंग गल्ली, जुने बेळगांव येथील मुख्य रस्त्यावरील गेल्या दीड महिन्यापासून फुटलेल्या अवस्थेत असलेल्या आणि गंभीर अपघाताला निमंत्रण देणाऱ्या ड्रेनेजच्या चेंबरची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
रामलिंग गल्ली, जुने बेळगांव येथील मुख्य रस्त्यावरील ड्रेनेजचे चेंबर गेल्या दीड दोन महिन्यांपासून फुटले आहे. परिणामी त्या ठिकाणी रस्त्यावर धोकादायक खड्डा निर्माण होण्याबरोबरच ड्रेनेज मधील सांडपाणी घाण -केरकचरा बाहेर येऊन सर्वत्र दुर्गंधीचे वातावरण पसरलेले आहे.
फुटलेल्या ड्रेनेज चेंबरच्या ठिकाणी निर्माण झालेला रस्त्यावरील जीवघेणा खड्डा अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. गेल्या कांही दिवसात 3 -4 अपघात होवून महिला व बुजुर्ग व्यक्तींना दुखापत झाल्याची घटना घडली आहे.
रामलिंग गल्ली, जुने बेळगांव हा रस्ता वडगाववरून राष्ट्रीय महामार्गाकडे जाण्यासाठी मुख्य रस्ता असून या रस्त्यावर अवजड वाहनांची सततची वर्दळ सुरू असते. आश्चर्याची बाब म्हणजे हा ड्रेनेज गेल्या वर्षी मे महिन्यात निर्माण केला होता आणि एक वर्षात हा ड्रेनेज पुन्हा खराब झाला आहे.

यासंदर्भात महापालिकेच्या या भागातील अधिकाऱ्यांसह प्रभागाच्या नगरसेवकांकडे तक्रार करून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आता महिना उलटला तरी सदर समस्येवर तोडगा काढण्यात आलेला नाही.
परिणामी या ठिकाणी विशेष करून रात्रीच्या वेळी एखादा गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी महापालिकेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रामलिंग गल्ली, जुने बेळगांव येथील मुख्य रस्त्यावरील खराब झालेल्या ड्रेनेजची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश द्यावेत अशी जोरदार मागणी केली जात आहे.


