belgaum

जुन्या पीबी रोडवरील गुड्स टेम्पो पार्किंग हटवू नये -डीसींकडे मागणी

0
18
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील जुन्या पी.बी. रोडवरील भुईकोट किल्ल्या जवळील खुल्या जागेचा वापर आम्ही गेल्या 50 वर्षापासून उदरनिर्वाहा करीता आमच्या गुड्स टेम्पोंच्या पार्किंगसाठी करत असल्यामुळे सदर पार्किंग हटवले जाऊ नये आणि तसे निर्देश बेळगाव कॅन्टोन्मेंट प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 विभागाचे कार्यकारी अभियंता व पोलीस प्रशासनाला देण्यात यावेत, अशी मागणी द बेळगाव गुड्स टेम्पो ओनर्स असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

बेळगाव गुड्स टेम्पो ओनर्स असोसिएशनचे पदाधिकारी आणि टेम्पो चालकांच्यावतीने ॲड. अण्णासाहेब घोरपडे व ॲड. स्नेहा ए घोरपडे -लाड यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर केले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असे आश्वासन दिले. आम्ही द बेळगाव गुड्स टेम्पो ओनर्स असोसिएशनचे सदस्य गेल्या 50 वर्षापासून जुन्या पी बी रोड वरील किल्ल्याजवळील खुल्या जागेचा वापर आमच्या मालवाहू टेम्पोच्या पार्किंगसाठी करत आहोत.

 belgaum

आम्ही आमचे गुड्स टेम्पो किल्ल्याजवळ माल वाहतूक व्यवसाय करण्यासाठी पार्क करतो. आजूबाजूच्या लोकांना किंवा कोणत्याही संस्थेला किंवा व्यक्तीला कोणताही त्रास किंवा अडथळा न आणता आम्ही आमचा व्यवसाय करतो. मोठ्या व्याजदराने वित्तीय संस्थांकडून वाहने खरेदी करून दैनंदिन उदरनिर्वाह करण्यासाठी सदर जागेत आम्ही गेली अनेक वर्ष हा व्यवसाय करत आहोत. त्यामुळे शहरासह आजूबाजूच्या सर्व गावातील लोकांना हे गुड्स अर्थात मालवाहू टेम्पोचे पार्किंगचे ठिकाण सुपरिचित आहे.

ज्यामुळे ते या ठिकाणी पोहोचतात आणि त्यांच्या वैयक्तिक कारणांसाठी टेम्पो भाड्याने घेत असतात. मात्र अलीकडे बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पोलीस प्रशासनाकडून आम्हाला त्रास दिला जात असून किल्ल्याजवळील संबंधित जागेत मालवाहू टेम्पो पार्क करण्यास मज्जाव केला जात आहे या ठिकाणी तुमचे मालवाहू टेम्पो पार्क कराल तर तुमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून जेलमध्ये धाडू, असे पोलीस अधिकाऱ्यांकडून धमकावले जात आहे.

सदर जागेत मालवाहू टेम्पोच्या पार्किंगला बंदी घालण्यात आल्यास आम्ही आमच्या व्यवसायाला मुकणार आहोत. तसे झाल्यास या माल वाहतुकीच्या व्यवसायावरच आमचा उदरनिर्वाह चालत असल्यामुळे हा व्यवसाय बंद झाल्यास आमचे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येणार आहे. तरी याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित जागेतील आमच्या मालवाहू टेम्पोचे पार्किंग हटवले जाऊ नये.

तसेच आमच्या उदरनिर्वाहासाठी आम्ही संबंधित जागेचा वापर करत असल्यामुळे आम्हाला तेथून हटवण्याचे अथवा त्रास न देण्याचे निर्देश बेळगाव कॅन्टोन्मेंट प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 विभागाचे कार्यकारी अभियंता व पोलीस प्रशासनाला देण्यात यावेत, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी गुड्स टेम्पो मालक आणि चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.