बेळगाव लाईव्ह विशेष : आगामी ऑक्टोबर महिन्यात बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीसीसी) बँकेच्या १९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, माजी आमदार अरविंद पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी खानापूर तालुक्यातील सर्व प्राथमिक कृषी सहकारी संस्थांच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापन मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केएमएफचे अध्यक्ष आणि अरभावी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भालचंद्र जारकीहोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासोबत डीसीसी बँकेचे कित्तूरचे माजी आमदार महांतेश दोड्डगौडर, राजू अंकलगी, माजी आमदार अरविंद पाटील, जोतिबा रेमानाचे, खानापूर परिसरातील कृषी बँक व्यवस्थापक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, कर्मचारी, कार्यकर्ते आणि नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले, त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी खानापूर मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे.
लक्षवेधी ठरली होती मागील निवडणूक
गेल्या 5 वर्षांपूर्वी झालेल्या डीसीसी बँकेच्या निवडणुकीत खानापूरची लढत लक्षवेधी ठरली होती. तत्कालीन आमदार अंजली निंबाळकर आणि विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यासह खानापुरातील सर्वपक्षीय अरविंद पाटील यांच्या विरोधात एकवटले असतानाही, अरविंद पाटील यांनी केवळ एका मताच्या फरकाने निसटता विजय मिळवला होता. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली होती. सध्या पुन्हा एकदा खानापूर तालुक्यातून डीसीसी बँकेवर जाण्यासाठी अरविंद पाटील इच्छुक आहेत. भालचंद्र जारकीहोळी यांनी अरविंद पाटील यांना ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे. विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर आणि अरविंद पाटील यांच्यातील मतभेद मिटवण्याचे आवाहनही भालचंद्र जारकीहोळी यांनी केले आहे. या निमित्ताने खानापूर तालुक्यात पुन्हा एकदा डीसीसी बँकेच्या राजकारणाने उचल खाल्ली आहे.
केएमएफ आणि कृषी पतसंस्थांच्या सदस्यांचा मेळावा बुधवारी खानापुरात आयोजित करण्यात आला होता, यावेळी मोठ्या संख्येने सदस्यांनी हजेरी लावली. मागील वेळी अंजली निंबाळकर स्वतः अरविंद पाटील यांच्या विरोधात निवडणुकीत उभ्या होत्या. यावेळी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी उभे राहण्याची शक्यता आहे. त्यांनीही खानापूर तालुक्यातून डीसीसी बँकेवर जाण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केल्याची चर्चा आहे. जर चन्नराज हट्टीहोळी विरुद्ध अरविंद पाटील अशी लढत झाली, तर पुन्हा एकदा जारकीहोळी विरुद्ध हेब्बाळकर यांच्यात चुरस निर्माण होऊन संघर्ष पाहायला मिळेल अशी शक्यता आहे.

खानापुरात निवडणूक लागल्यास …आम्ही अरविंद सोबत :भालचंद्र जारकीहोळी
यावेळी बोलताना भालचंद्र जारकीहोळी यांनी स्पष्ट केले की, अद्याप निवडणुकीची तारीख निश्चित झाली नसली तरी, रिटर्निंग ऑफिसर यांच्याकडे १९ ऑक्टोबर २०२५ रोजी निवडणूक घेण्यासंदर्भात पत्र देण्यात आले आहे आणि हीच तारीख जवळपास निश्चित मानली जात आहे. बेळगाव जिल्हा सहकारी बँकेने सर्वाधिक कर्ज शेतकऱ्यांना दिले असून, भविष्यातही शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक योजना राबविण्यात येतील असे त्यांनी सांगितले. तसेच आधी साखर कारखान्यांना कर्जवितरण करण्यात येत होते, मात्र साखर कारखान्यांची परिस्थिती पाहता सध्या कर्जवितरण थांबविण्यात आले आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक कर्जवितरण देण्यासाठी भविष्यात योजना आखण्याचा विचार आहे, अशी माहितीही आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी दिली.
आमदार भालचंद्र जारकीहोळी पुढे म्हणाले, खानापुरात भाजपच्या आमदारांची सत्ता आहे. माजी आमदार अरविंद पाटील यांना सहकार क्षेत्रात सहकार्य करण्यासंदर्भात येथील आमदारांना आम्ही सांगितले आहे. दोघांमध्ये मतभेद आहेत. हे मतभेद दोघांनी सामंजस्याने मिटवण्यासाठी मी आवाहन करत आहे. मतभेद मिटवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, परंतु सामंजस्याने मतभेद मिटले नाहीत तर निवडणूक अटळ आहे. मात्र, निवडणुकीत आमचा पाठिंबा हा अरविंद पाटील यांनाच असेल, असे ते म्हणाले.
जारकीहोळींच्या या विधानामुळे सहकार क्षेत्रातील राजकारणात मोठी उलथापालथ निश्चित मानली जात आहे. एका बाजूला जारकीहोळी कुटुंबाचा पाठिंबा मिळवून अरविंद पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न दिसतो, तर दुसरीकडे विद्यमान आमदार आणि चन्नराज हट्टीहोळींसारख्या नव्या स्पर्धकांमुळे ही निवडणूक चुरशीची ठरली जाण्याची शक्यता आहे.


