बेळगाव लाईव्ह : नेहमी कोणत्या ना कोणत्या चुकीच्या कारणाने चर्चेत राहणारी बेळगाव महापालिका आणखी एका चुकीत सापडली आहे.
फसवणूक आणि कार्यालयीन अक्षम्य निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार बेळगाव महानगरपालिकेत उघडकीस आला असून चक्क एका जिवंत महिलेसाठी मृत्यू दाखला जारी करण्यात आला आहे. ज्याच्या आधारे त्या महिलेच्या पतीने 23 लाख रुपयांचा विमा निधी हडपण्याचा प्रयत्न केला आहे.
वडगाव येथील नाझर कॅम्प येथील रहिवासी असलेल्या महिलेच्या पतीने तिच्या मृत्यू दाखल्यासाठी अर्ज सादर केला होता. त्या अर्जाची महापालिकेने योग्य पडताळणी न करता मृत्यू दाखल्याची प्रक्रिया पार पडली. त्या मृत्यू दाखल्याचा वापर करून संबंधित महिलेच्या पतीने विमा कंपनीकडे भरपाईसाठी दावा दाखल केला.
विमा कंपनीकडून प्रारंभी 23 लाख रुपये मंजूरही करण्यात आले. तथापि भरपाईचा आणखी एक अर्ज दाखल झाला. या दुसऱ्या भरपाई अर्जामुळे संशय निर्माण होऊन विमा कंपनीने पोलिसांच्या मदतीने चौकशी सुरू केली. तेंव्हा ती महिला जिवंत असल्याचे आढळून आले.
चौकशीदरम्यान त्या पुरूषाने व्हिडिओ कॉल देखील केल्यामुळे तिच्या अस्तित्वाची पुष्टी झाली. विमा कंपनीने जरी 23 लाख रुपये मंजूर केले असले तरी, विसंगतींमुळे पैसे वितरण रोखण्यात आले, ज्यामुळे फसवणूक टाळता आली. विमा अधिकारी आणि पोलिसांनी महानगरपालिका आयुक्त शुभा बी यांची भेट घेतल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
सदर प्रकाराने धक्का बसलेल्या आयुक्तांनी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे ज्यांच्या देखरेखीखाली मृत्यू दाखला जारी करण्यात आला होता, त्यांना पोलिस तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली असली तरी अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही. प्राथमिक निष्कर्षांमध्ये सदर फसवणूक प्रकरणात वडगाव स्मशानभूमीतील एका कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचे दिसून येतो. ज्याने खोटे कागदपत्रे तयार करण्यासाठी 50 हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे.
योग्य पडताळणीशिवाय अनिवार्य असलेले ना-हरकत प्रमाणपत्र जारी केल्याबद्दल नाझर कॅम्प विभागातील एका महिला आरोग्य निरीक्षकाचीही चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे महापालिकेत मोठी खळबळ उडाली आहे.


