बेळगाव लाईव्ह :जे घडून गेले आहे ते पुन्हा पूर्ववत करता येणार नाही. तथापि पवित्र धर्मग्रंथ विटंबना प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आता आधुनिक तपास यंत्रणेने सज्ज सीआयडी पथक दाखल झाले आहे. तेंव्हा येत्या कांही दिवसात गुन्हेगारांना गजाआड केले जाईल, असा विश्वास बेळगावचे नूतन पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी व्यक्त केला.
पवित्र धर्मग्रंथ विटंबना प्रकरण तपासासंदर्भात सीआयडी पथकाने काल मंगळवारी संतीबस्तवाड गावाला भेट दिली. या भेटीनंतर संतीबस्तवाड ग्रामपंचायत कार्यालय आवारात आयोजित हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधवांच्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
पोलीस आयुक्त बोरसे आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना म्हणाले की, आपल्या गावात एखादी अनुचित घटना, गैर कृत्य घडले की कांही अतिउत्साही मंडळी त्याचे व्हिडिओ चित्रण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करतात. हा प्रकार थांबला पाहिजे, कारण तसे केल्यामुळे जगभर पसरलेल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गावाची, जिल्ह्याची आणि राज्याची सर्वत्र नाचक्की होते हे लक्षात घेतले पाहिजे. पोलीस अधिकारी वर्ष -दोन वर्ष आपले कर्तव्य बजावून बदली झाली की निघून जातात. परंतु तुम्हा सर्व जाती-धर्माच्या गावकऱ्यांना कायम येथेच राहायचे आहे.
दररोज सकाळी एकमेकांची तोंडे पहायची आहेत. त्यामुळे भांडून एकमेकांना दोष देत राहण्यापेक्षा सर्वांनी सौहार्दाने राहिले पाहिजे. जे घडून गेलं त्याबाबतीत आपण आता कांही करू शकत नाही. मात्र आता उच्च दर्जाचे तपास कार्य करणाऱ्या सीआयडी पथकाला पाचारण करण्यात आले आहे. गुन्हे तपासाच्या अत्याधुनिक यंत्रणेसह ते येथे आले आहेत. त्यामुळे निश्चित दिवस न सांगता येत्या कांही दिवसात गुन्हेगारांना अटक केली जाईल, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
यापुढे आपल्या गावात कोणतीही लहान-मोठी अनुचित घटना घडली तर तुम्ही सर्वप्रथम थेट मला फोन करा. मी पोलीस आयुक्त जरी असलो तरी सर्वप्रथम जनतेचा सेवक आहे. भारतीय पोलीस सेवा या आमच्या नावामध्येच सेवा लिहिलेली असून आम्ही तुमचे सेवक आहोत. समाजातील शांतता अबाधित राखणे हे आमचे सर्वात पहिले काम असते. तुम्हाला कोणताही त्रास झाला माझ्याशी संपर्क साधा मी तात्काळ सेवेसाठी हजर होईन, असे ते पुढे म्हणाले.
पोलीस तपासाचा भाग म्हणून लोकांना पकडून व्हॅनमध्ये घालून घेऊन जाणे आम्हालाही आवडत नाही. गावातील जे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे विविध जाती धर्माचे नागरिक आहेत, त्यांच्यात सौहार्दपूर्ण वातावरण असले पाहिजे आणि संतीबस्तवाड गावामध्ये ते आहे असे माझ्या कानावर आले आहे. येथील हिंदू बांधव मुस्लिम बांधवांच्या सणांमध्ये आणि मुस्लिम बांधव हिंदूंच्या सणांमध्ये सहभागी होत असतात असे मला कळाले आहे. अशा या गावात धार्मिक फूट पडणे योग्य नाही. विघ्न संतोषी लोकांचे, समाजकंटकांचे काम अतिशय सोपे असते. ते दगडफेक करून निघून जातात.

कारण त्यांना माहीत असते की आपल्या दगडफेकीमुळे समाजात अशांतता निर्माण होणार, दोन जाती-धर्मांच्या लोकांमध्ये तेढ निर्माण होणार आहे. नेमके हेच घडू नये यासाठी आपण आपली गावातील एकजूटता, सौहार्दता कायम राखली पाहिजे. पोलीस तपास व चौकशी संदर्भातील आपल्या तक्रारींची दखल मी घेतली असून यापुढे गावातील कोणालाही निष्कारण त्रास दिला जाणार नाही असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले.
तसेच या गावातील युवक गैरमार्गाला न लागता चांगले शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनियर, चांगला व्यवसायिक, आयएएस आयपीएस अधिकारी झाले तर आम्हालाही त्याचा आनंदच आहे असे सांगून संपूर्ण गावाने एका कुटुंबाप्रमाणे राहिले पाहिजे. पोलीस खाते 24 तास तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे. कोणतीही गंभीर तक्रार अथवा माहिती द्यायची असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा. मी तुमच्या तक्रारीची दखल घेईन. मात्र कृपा करून आपापसात भांडून समाजात फूट पडू देऊ नका, असे आवाहन पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी शेवटी केले.
संतीबस्तवाड येथील पवित्र धर्मग्रंथ विटंबना प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक पोलिसांना अपयश आल्याने सदर प्रकरण नवे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी अधिक तपाससाठी सीआयडीकडे वर्ग केले आहे. त्यामुळे सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला असून काल मंगळवारी सीआयडीचे पोलीस महासंचालक (डीआयजी) शंतनु सिन्हा आणि पोलीस अधीक्षक शुभन्विता एस. यांनी स्वतः संधी बस्तवाड गावाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत पोलीस आयुक्त भूषण बोरसे हे देखील उपस्थित होते.


