बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर दोन दिवस सतत सामूहिक अत्याचार झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच आरोपींना अटक केली असून, फरार असलेल्या एका आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती नूतन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी आज दिली.
या घटनेची माहिती देताना बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी माध्यमांना संबोधित केले. ते म्हणाले की, “गेल्या डिसेंबरमध्ये घडलेल्या घटनेचे चित्रीकरण करण्यात आले होते आणि जानेवारीमध्ये पुन्हा तिला बोलावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, २४ तासांच्या आत एपीएमसी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. फरार असलेल्या एका आरोपीला लवकरच पकडू.”
पंधरा वर्षांच्या या मुलीवर दोन वेळा सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सहा महिन्यांपूर्वीही तिच्यावर सामूहिक बलात्कार करून आरोपींनी त्याचा व्हिडिओ बनवला होता. एका मित्राने तिला फूस लावून डोंगराळ भागातील ठिकाणी नेऊन अत्याचार केला होता. नंतर त्याच व्हिडिओचा वापर करून आरोपींनी तिला ब्लॅकमेल केले आणि पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. यावेळीही दुष्कर्म्यांनी व्हिडिओ बनवला होता. याच व्हिडिओचा वापर करून आता पुन्हा मुलीला धमकावण्यात येत होते. या गंभीर प्रकरणाची नोंद एपीएमसी पोलीस ठाण्यात ‘पॉक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत करण्यात आली आहे.

अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलीवर रिसॉर्टमध्ये सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच, आता ही दुसरी संतापजनक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीला एका चालकाने अपहरण करून बेळगाव तालुक्यातील काकती येथील डोंगराळ आणि निर्जन भागात नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. काकती पोलिसांनी पाच आरोपींना गजाआड केले असून, उर्वरित एका आरोपीला पकडण्यासाठी जाळे टाकले आहे.
आयुक्तांनी पुढे सांगितले की, “सहा आरोपींपैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत. न्यायवैद्यक पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. आरोपींना २० वर्षांपेक्षा जास्त शिक्षा होण्याची शक्यता असून, आरोपपत्र लवकरच सादर करून या प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण केला जाईल.” तसेच, बेळगावातील डोंगराळ आणि निर्जन भागांमध्ये ड्रोनचा वापर करून किंवा इतर मार्गांनी गस्त वाढवली जाईल, असेही आयुक्त बोरसे यांनी नमूद केले.
एका आठवड्यापूर्वी एका रिसॉर्टमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्या प्रकरणात दोन बाल-आरोपींसह पाच जणांना अटक करण्यात आली होती. हि घटना ताजी असतानाच पुन्हा अशीच घटना उघडकीस आल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे.


