बेळगाव लाईव्ह विशेष : देशात भारतीय संविधानाची राज्य घटनेची पायमल्ली होत असल्याचे आरोप आपण अनेकदा ऐकले असतील पण भारतीय संविधानाला सर्वोच्च स्थान देत चक्क लग्नात मंगलाष्टक ऐवजी भारतीय संविधान वाचत विवाह सोहळा संपन्न झाला आहे.
बेळगाव शहरात एका अनोख्या विवाह सोहळ्याला साक्षी राहण्याची संधी नागरिकांना मिळाली. दलित चळवळीतील अग्रगण्य नेते मल्लेश चौगुले यांच्या मुलाने भारतीय संविधानाची शपथ घेऊन विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेत, समाजात नवा आदर्श निर्माण केला.
बेळगावातील महात्मा गांधी भवन येथे रविवारी पार पडलेल्या विवाह सोहळ्याने समाजात एक नवा पायंडा पाडला. दलित नेते आणि सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगुले यांच्या कनिष्ठ पुत्र ॲड. विशाल चौगुले आणि आरती कणगलेकर यांचा विवाह पारंपरिक धार्मिक विधींऐवजी भारतीय संविधानाच्या प्रतिज्ञेने संपन्न झाला.
या विवाह सोहळ्यात नवरदेव-नवरीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा स्वीकार करत संविधानाची शपथ घेतली. ॲड. श्यामसुंदर पत्तार आणि ॲड. नागरत्ना पत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली वधू-वरांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे पठण केले. प्रतिज्ञेनंतर त्यांना संविधानाच्या प्रती देऊन सन्मानित करण्यात आले.
विवाहानंतर नवदाम्पत्याने संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. हा सोहळा पाहणाऱ्या प्रत्येकासाठी हा क्षण भावनिक ठरला. हा विवाहसोहळा केवळ विवाह नसून, समतेच्या विचारसरणीचा एक सार्वजनिक संदेश ठरला आहे.

या विवाहप्रसंगी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार प्रसाद अब्बय्या, चन्नराज हट्टीहोळी, असिफ शेठ, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, कोल्हापूरचे संग्रामसिंह गायकवाड, विजय पोळ, तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथील बहुजन चळवळीचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
या निर्णयामागील हेतू स्पष्ट करताना मल्लेश चौगुले यांनी सांगितले की, “आजच्या पिढीला संविधानाची जाणीव करून देणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही धार्मिक विधींऐवजी संविधानाच्या शपथविधीने हा विवाह पार पाडण्याचा निर्णय घेतला.”
या अभूतपूर्व विवाह सोहळ्याने संविधानवादाच्या प्रचाराला चालना दिली असून, भविष्यात इतरांनीही या मार्गाचा अवलंब करावा, असा सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे. शिवाय समाजात सुरु असलेल्या विवाह सोहळ्याच्या फॅशन ला फाटा देत आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची बेळगावात मोठी चर्चा आहे.