बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगाव एक वेगळ्या धाटणीचं गाव, शहरी ग्रामीण संस्कृती इथे हातात हात घालून नांदत आहे. श्रीमंती गरिबी यांच्यातला भेदभाव फार अस्पष्ट आहे. श्रीमंतांना आपल्या श्रीमंतीचा गर्व नाही, आणि कुठेही गरिबांना गरिबीचा बोचणारा वणवा नाही. इथल्या माणसाचं जगणं आहे साधं सरळ आणि एकमेकांशी भावबंधनाने गुंतलेले पण सध्या या प्रसारमाध्यमाच्या युगात जग जवळ आलं आणि या जगण्याला हळूहळू हादरे बसायला लागले, माणसं आपलं वास्तव जगणं सोडून पोकळ दिखाव्याच्या जगण्याकडे आकर्षित होऊ लागली आणि जगण्याची एक वेगळी अस्वस्थता निर्माण झाली त्यामुळे बहुसंख्य मध्यमवर्गीय बहुजन समाज सध्या एका मोठ्या सामाजिक आणि आर्थिक आव्हानाला सामोरे जात आहे.
एकेकाळी शेती हाच त्यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार होता, परंतु आधुनिकीकरण, विकासकामे आणि विविध प्रकल्पांमुळे अनेक कुटुंबांनी आपली शेती विकली. यामुळे बहुजन समाजातील, विशेषतः तरुण पिढी, आर्थिकदृष्ट्या पूर्वीइतकी सधन राहिली नाही. असे असतानाही, आजचा तरुण आणि बहुजन समाज सोशल मीडियाच्या प्रभावाखाली आणि भव्यदिव्य सोहळ्यांच्या ‘फॅड’मध्ये गुरफटत चालला आहे. चुकीच्या चालीरीती, प्रथा आणि पद्धतींमध्ये अडकून त्यांची आर्थिक कुचंबणा वाढत आहे. एकाने केलेला भव्य सोहळा पाहून दुसऱ्याने तसेच करण्याचा प्रयत्न करणे आणि सोशल मीडियावर त्याची प्रसिद्धी करणे, यातच अनेकजण धन्यता मानत आहेत, पण याचा त्यांच्या भविष्यावर काय परिणाम होईल, याचा विचार ते करत नाहीत.
गेल्या काही काळात आपण अनेक हृदयद्रावक हुंडाबळीच्या घटना पाहिल्या आहेत. या घटनांनी केवळ तरुणींचेच नव्हे, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. आज लग्नसमारंभात होणारा बडेजाव, भंपकबाजी आणि सोहळ्यांच्या नावाखाली सुरू असलेले अनेक चुकीचे प्रकार, वरातीमध्ये पैशांचा होणारा अवाजवी चुराडा, हे सर्वसामान्य कुटुंबांना परवडणारे नाही. आपला ‘स्टेटस’ सांभाळण्याच्या नादात अनेकजण कर्जाचा डोंगर वाढवून असे सोहळे साजरे करण्यात मग्न आहेत. याचा परिणाम म्हणून भविष्यात त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. एकीकडे वाढती बेरोजगारी आणि कमकुवत आर्थिक उत्पन्न असताना, क्षणिक सुखाला बळी पडून आणि भुलून केलेली ही अवाजवी मजा पुढील काळात मोठी शिक्षा ठरू शकते, याची जाणीव समाजाने ठेवणे आवश्यक आहे.
गेल्या वर्षभरात बेळगाव तालुक्यातील अनेक भागांमध्ये श्री महालक्ष्मी यात्रा आणि जत्रा साजऱ्या झाल्या, तसेच वार्षिकोत्सवही पार पडले. या दरम्यान, अनेक गावांनी स्तुत्य निर्णय घेतले, ज्यात आहेर आणि पशुबळी यासारख्या घटनांवर रोख लावण्यात आली. बहुजन समाजाची सुधारणा व्हावी आणि तरुणांची प्रगती व्हावी या उद्देशाने सोशल मीडियावरही याबाबत सकारात्मक चर्चा सुरू झाली. अनेकांनी या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसादही दिला. काही ठिकाणी चुकीच्या पद्धतींना फाटा देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला. मात्र, अजूनही अशा अनेक कुप्रथा सुरूच असल्याचे दिसून येते, ज्यामुळे समाजाची प्रगती खुंटत असल्याचे दिसून येत आहे.

या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी, महाराष्ट्रात मराठा समाजाने लागू केलेली विवाह आचारसंहिता बेळगाव सीमाभागासाठी अत्यंत गरजेची आणि उपयुक्त ठरू शकते. ही आचारसंहिता हुंडाबंदीला प्रोत्साहन देते आणि हुंडा घेणाऱ्या किंवा महिलांचा छळ करणाऱ्या कुटुंबांना समाजातून बहिष्कृत करण्याचा कठोर नियम करते. तसेच, विवाह सोहळे १०० ते २०० लोकांच्या उपस्थितीत साधेपणाने पार पाडण्याचा आग्रह धरते, ज्यामुळे अनावश्यक गर्दी आणि खर्च टाळता येईल. डीजे, प्री-वेडिंग शूट आणि फटाक्यांसारख्या अनावश्यक गोष्टींवर बंदी घालणे, पारंपरिक वाद्ये आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देणे, तसेच लग्न, साखरपुडा आणि हळद हे एकाच दिवशी करून वेळ व खर्चाची बचत करणे यावर ती भर देते.
या आचारसंहितेनुसार, विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्च टाळून तो पैसा मुलगा-मुलगी यांच्या नावावर एफडी स्वरूपात ठेवण्याचे किंवा गरजू व्यक्तींना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सामूहिक विवाह सोहळ्यांना प्राधान्य देणे, अनावश्यक मानपानाचे प्रदर्शन टाळणे, साड्या आणि भेटवस्तू देणे बंद करणे, तसेच दशक्रिया विधी आणि तेराव्याच्या भोजनावळीला बंदी घालणे, यासारख्या नियमांनी समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यास मदत होईल. नैतिक मूल्यांना महत्त्व देत सोहळे साजरे झाले तर समाजाला नवी दिशा मिळू शकेल.
सण असोत किंवा उत्सव, विवाह सोहळ्यापासून प्रत्येक सोहळा हा पारंपरिक पद्धतीने साजरा करून आपली संस्कृती जतन करणे आणि पूर्वापार चालत आलेल्या प्रथांमागील मूळ उद्देश जोपासणे हे सध्याच्या काळात अत्यंत गरजेचे आहे. केवळ तात्पुरत्या दिखाव्यापेक्षा सामाजिक स्वास्थ आणि आर्थिक स्थैर्य अधिक महत्त्वाचे आहे. चुकीच्या गोष्टींना वेळीच रोख लावण्यात आला तर यामुळे समाजातील प्रत्येक कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळेल आणि भावी पिढीसाठी एक चांगला आदर्श देखील निर्माण होईल. बहुजन समाजाने महाराष्ट्रातील आचारसंहितेचा आदर्श घेऊन बेळगावातही तिची प्रभावी अंमलबजावणी करावी, हीच काळाची गरज आहे.
माणसाचं जगणं हे नैसर्गिक असावं, उसन्या अनुकरणाने येणाऱ्या कृत्रिमतेमुळे त्याच्या जगण्यात मोठ्या प्रमाणात त्रुटी निर्माण होतात आणि त्याला मानसिक ताण-तणावाला सामोरे जावे लागते, आर्थिक विवंचना चालू होतात, असलेले नातेसंबंध दुरावतात, एकंदर जगण्याची निरामय प्रक्रिया हीच विस्कळीत होते. हे जर टाळायचं असेल तर आपलं जगणं सहज साधं सोपं आपल्या परिस्थितीला परवडणारे, शारीरिक क्षमतेला झेपणारे असायला पाहिजे,आणि आजूबाजूच्या सामाजिक जगण्यातील शांतता टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे याचे भान मात्र आपण राखले पाहिजे. या सगळ्यांचा सारासार विचार करून आपल्या जगण्यात ज्या अपप्रवृत्ती मिसळत चालल्या आहेत त्या टाळाव्याच लागतील.


