बेळगाव लाईव्ह : “जेव्हा आपण कोणतीही चूक केलेली नाही, तेंव्हा लाजिरवाणेपणाचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे मत व्यक्त करताना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेंगलोर चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयपीएल विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाच्या स्वागत समारंभाप्रसंगी घडलेल्या 11 जणांचा बळी घेणाऱ्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेस आमचे सरकार जबाबदार नाही, असे स्पष्ट केले आहे.
म्हैसूर विमानतळावर काल रविवारी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, त्या दुर्घटनेशी माझा काहीही संबंध नाही. जेव्हा आपण कोणतीही चूक केलेली नाही, तेव्हा लाजिरवाणेपणाचा प्रश्नच उद्भवत नाही. मी पुन्हा सांगतो की अशी घटना घडायला नको होती आणि ती प्रथमदर्शनी अधिकाऱ्यांच्या कर्तव्यात हलगर्जीपणामुळे घडली आहे.
” बेंगलोर शहर पोलीस आयुक्तांनी मला या दुर्घटनेची माहिती नंतर दिली. ती माहिती समजताच मला आणि संपूर्ण राज्य सरकारला प्रचंड दुःख झाले. चेंगराचेंगरीमुळे झालेला पहिला मृत्यू दुपारी 3:50 वाजता झाला होता, परंतु मला त्याची माहिती फक्त 5:45 वाजता मिळाली.”
आपल्या सरकारचा बचाव करताना मुख्यमंत्र्यांनी गुप्तचर महानिरीक्षक बदलणे तसेच त्यांच्या राजकीय सचिवांना काढून टाकणे यासह कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. सरकारने सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे,” असे माध्यमांना सांगितले.
“मुख्य सचिवांनी मला सांगितले की पोलिसांनी परवानगी दिली आहे आणि ते कार्यक्रम आयोजित करतील. त्या कार्यक्रमाचे आयोजन करणारे केएससीए (कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन) सचिव आणि कोषाध्यक्ष यांनी मला आमंत्रित केले आणि सांगितले की राज्यपाल देखील सहभागी होतील. विधान सौध परिसराजवळ कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तथापी चिन्नास्वामी स्टेडियममधील कार्यक्रमासाठी मला आमंत्रित करण्यात आले नव्हते,” अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुढे दिली.
भारतीय जनता पक्षाने (भाजप) काँग्रेस सरकारवर केलेल्या बेंगलोरची प्रतिमा खराब केल्याच्या आरोपाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी, “उत्तर प्रदेशात कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीत 50 ते 60 लोकांचा मृत्यू झाला. तेंव्हा भाजप आणि निजद नेत्यांनी कोणाचा राजीनामा मागितला होता का? त्याच दिवशी पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेला पूल कोसळल्यानंतर 100 लोकांचा मृत्यू झाला. तेंव्हा त्यांनी पंतप्रधानांचा राजीनामा मागितला होता का?” असे प्रतिप्रश्न केले. बेंगलोरच्या बाहेरील भागात क्रिकेट स्टेडियम स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाबद्दल विचारले असता, त्यांनी योग्य जागा ओळखावी लागेल आणि या सूचनेवर योग्य विचार केला जाईल, असे उत्तर दिले.
दरम्यान, चिन्नास्वामी स्टेडियम येथील आरसीबीच्या विजयोत्सवास बेंगलोर पोलीस आयुक्त अथवा त्यांच्या हाताखालील कोणत्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली? इतक्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमा होणार याची माहिती पोलिसांनी सरकारला द्यायला हवी होती. ती वेळीच का दिली गेली नाही? तेंव्हा एकंदर पाहिले तर बेंगलोर येथे घडलेल्या चिंगराचेंगरीच्या दुर्घटनेस पोलिसांची चूकच कारणीभूत आहे, असे स्पष्ट मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. हासन जिल्ह्यातील आहे होळेनरसीपुर गावातील खासदार श्रेयस एम. पाटील यांच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीप्रसंगी बेंगलोर चिन्हास्वामी स्टेडियमच्या ठिकाणी अलीकडेच घडलेल्या चेंगराचेंगरीच्या भीषण दुर्घटनेसंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उपरोक्त उत्तर दिले.


