बेळगाव लाईव्ह :पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या दूर करण्याच्या उद्देशाने गटारी, नाले, रस्ते वगैरेंची कामे पूर्ण करण्यासंदर्भात बेळगाव महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीची बैठक आज पार पडली.
महापालिका कार्यालयात सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीचे अध्यक्ष नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित स्थायी समितीच्या बैठकीत शहरात पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या विविध समस्या सोडवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. याप्रसंगी सदर स्थायी समितीचे सदस्य असलेले सर्व नगरसेवक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर बेळगाव लाईव्हला माहिती देताना अध्यक्ष जयतीर्थ सौंदत्ती यांनी सांगितले की, आजच्या आमच्या सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर्ण करावयाच्या गटारी नाले रस्ता वगैरेंच्या कामांबद्दल चर्चा करून निर्णय घेण्यात आले. अलीकडेच महापौर व उपमहापौरांनी वनखात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना शहरातील धोकादायक झाडे आणि फांद्या हटवण्याचे सूचना केली आहे. तसेच त्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
आता रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी निविदा काढण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहरातील कच्चा आणि पक्क्या नाल्यांच्या देखभालीसाठी निधी मंजूर करण्यात आला असून नाला स्वच्छतेचे काम सुरू झाले आहे. या संदर्भात कोणकोणत्या भागात तुम्ही स्थानिक नगरसेवकाला विश्वासात घेऊन काम करत आहात, कामाचे स्वरूप वगैरे आवश्यक गोष्टींची नोंद ठेवण्याची सूचना संबंधित अभियंत्यांना करण्यात आली आहे.

बऱ्याच अभियंत्यांनी त्याची पूर्तताही केली आहे. आता लवकरच पडलेले खड्डे बुजवून रस्त्यांच्या देखभालीचे काम देखील हाती घेतले जाणार आहे. येत्या दोन-तीन दिवसात त्यासंबंधीची निविदा तयार होईल. गेल्या वर्षभराच्या माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत मी शक्य होईल तितकी विकास कामे करवून घेतली आहे. इलेक्ट्रिकलमध्ये देखील आम्ही बरीच कामे केली असून भुयारी गटार देखभालीचे काम मोठ्या प्रमाणात केले आहे.
एकंदर पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीची मी गेल्या वर्षभरात पूर्तता केली आहे आणि यासाठी मला सहकार्य करणाऱ्या सर्वांचा मी मनःपूर्वक आभारी आहे, असे नगरसेवक सौंदत्ती शेवटी म्हणाले.