बेळगाव लाईव्ह: रामलिंग गल्ली, जुने बेळगाव येथील मुख्य रस्त्यावरील ड्रेनेजच्या समस्येबद्दलच्या बेळगाव लाईव्हच्या वृत्ताची दखल घेत महापालिकेकडून या ड्रेनेजची स्वच्छता आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.
रामलिंग गल्ली जुनेबेळगांव येथील प्रमुख रस्त्यावरील ड्रेनेज फुटून रस्त्यात खड्डा निर्माण होण्याबरोबरच ड्रेनेजचे सांडपाणी संपूर्ण गल्लीत घाण व दुर्गंध पसरत होती.
परिणामी रामलिंग गल्लीतील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले होते. खराब झालेल्या ड्रेनेजच्या खड्ड्यामुळे कांही महिला व बुजुर्ग व्यक्तींना दुखापत देखील झाल्या होत्या.
वर्षभरापूर्वी बांधलेले हे ड्रेनेज या पद्धतीने खराब झाल्यामुळे गल्लीतील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. तसेच फुटलेल्या ड्रेनेज संदर्भात तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे ते हताश झाले होते.
त्यांच्या तक्रारीवरून खराब ड्रेनेजच्या समस्येबद्दल बेळगाव लाईव्हने अलीकडेच आवाज उठवला होता. त्याची दखल घेत महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून आता रामलिंग गल्ली येथील ड्रेनेजच्या स्वच्छतेसह दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे स्थानिक नागरिकात समाधान व्यक्त होत असून ते बेळगाव लाईव्हला दुवा देत आहेत.