बेळगाव लाईव्ह :बेळगावचे महापौर मंगेश पवार यांच्याविरुद्धच्या अपात्रतेप्रकरणी बहुप्रतिक्षित निकाल पुढे ढकलण्यात आला असून नगरविकास खात्याच्या सचिव दीपा चोळण यांनी त्यांचा अंतिम आदेश आणखी पाच दिवसांसाठी राखून ठेवला आहे.
बेळगावमधील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण करणाऱ्या या खटल्याचा निकाल काल बुधवारी निघण्याची अपेक्षा होती. तथापि, जनतेला अंतिम निर्णयाची वाट पहावी लागणार असून त्यामुळे महापौर पवार यांच्या राजकीय भविष्याभोवतीचा सस्पेंस वाढला.
वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या पवार यांनी ‘लाभाचे पद’ धारण करण्यासाठी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याचे आरोप आहेत. सदर आरोपावरून या वर्षाच्या सुरुवातीला बेळगाव प्रादेशिक आयुक्तांनी त्यांना नगरसेवक पदासाठी अपात्र ठरवले.
यासंदर्भात मंगेश पवार यांनी नगर विकास खात्याच्या सचिवांकडे केलेले सुरुवातीचे अपील सचिव चोळण यांनी प्रादेशिक आयुक्तांचा निर्णय कायम ठेवल्यामुळे अयशस्वी ठरले. त्यानंतर पवार यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा देताना महापौरपदाच्या निवडणुकीत मतदान करण्याची आणि ती लढण्याची परवानगी दिली. कायदेशीर अडचणी सुटल्या नसतानाही भाजपने पुढे जाऊन त्यांना उमेदवार म्हणून उभे केले. त्यानंतर पवार अखेर महापौरपदी निवडून आले.
कायदेशीर गोंधळात पवार यांना पाठिंबा देण्याच्या निर्णयावर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने टीका केली होती. याउलट बेळगाव स्थानिक भाजप लोकप्रतिनिधी यांच्यासह भाजप नेत्यांनी नगरसेवक अपात्रतेच्या प्रक्रियेदरम्यान प्रादेशिक आयुक्तांवर राजकीय दबावाखाली काम केल्याचा आरोप केला होता. उच्च न्यायालयाने नंतर अंतिम निर्णयासाठी प्रकरण पुन्हा नगर विकास खात्याच्या सचिवांकडे पाठवले. त्यामुळे आता जर सचिव चोळण या आपल्या मागील भूमिकेवर ठाम राहिल्या तर मंगेश पवार यांना आपले महापौरपद गमवावे लागण्याची शक्यता आहे
. त्याच वेळी पवार यांच्याप्रमाणे समान आरोप असलेले शहरातील दुसरे नगरसेवक जयंत जाधव यांच्याविरुद्ध देखील अशाच प्रकारचा खटला नगर विकास सचिवांनी चालवला आहे.


