बेळगाव लाईव्ह :प्रशासनाची निष्क्रियता दुर्लक्षामुळे दरवर्षीच्या पावसाळ्याप्रमाणे सध्या बळ्ळारी नाल्याचे पाणी आसपासच्या शेतात शिरले आहे. तथापि या पद्धतीने बळ्ळारी नालाच नव्हे तर बेकायदेशीर हालगा -मच्छे बायपास रस्त्यामुळे येथील शेतकरी एका नव्या संकटात सापडला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यामध्ये बळ्ळारी नाला हा परिसरातील अनगोळ ,वडगाव, शहापूर, माधवपूर, जूने बेळगाव, हालगा आणि बेळगावसह इतर शिवारासाठी शाप ठरला आहे. हा नाला शेतकऱ्यांसाठी शाप न ठरता वरदान ठरवा यासाठी नियोजन पूर्वक त्यातील गाळ, जलपर्णी,अतिक्रमण काढणे अत्यावश्यक आहे.
त्यासाठी परिसरातील शेतकरी अनेक वर्षांपासून झगडत असले तरी आश्वासना व्यतिरिक्त आजपर्यंत शेतकऱ्यांच्या पदरात कांहीच पडलेले नाही. नाल्याला येणाऱ्या अतिवृष्टीच्या पुरामुळे दरवर्षी उपरोक्त शिवारांमधील पीकं नष्ट होऊन शेतकरी संकटात सापडत आहे. यात भर म्हणून आता मच्छे पासून हालगा पर्यंतच्या सुपीक जमीनीत बेकायदेशीर व न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवत बायपास रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे सध्याच्या अतिवृष्टीत या पट्ट्यातील संपूर्ण शिवार पाण्याखाली गेल आहे.
आताच पेरणी केलेली खरिपाची भातपीकं पाणी व मुळका एक झाल्याने कूजणार असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरं जाव लागणार आहे.

शिवाराच्या या पट्ट्यात अनेक शेतकऱ्यांचा ऊस आहे. तसेच रताळी काढणी सुरु होण्याआधीच शेतात गुडघाभर पाणी भरले असून हे पीक देखील बरबाद होत असल्याने शेतकरी दुःखी झाले आहेत.
गेल्या 2002 पासून आजपर्यंत बेकायदेशीर बायपास रद्द करण्यासाठी शेतकरी लढत आहेत. सदर बायपास रस्त्याच्या वरील बाजूच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ठेकेदारने कोणतेच नियोजन न केल्यामुळे येळ्ळूरकडून येणारे पावसाचे अफाट पाणी बायपासच्या ठिकाणी थांबून खरिप पीकं नष्ट होणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी बळ्ळारी नालाच नव्हे तर बेकायदेशीर बायपासमुळे पुन्हा एका नव्या संकटात अडकल्याने त्यांच्यावर दयनिय परिस्थिती ओढवली आहे.


