बेळगाव लाईव्ह :शाळेतील विद्यार्थिनींना भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची निकालात काढताना बैलहोंगल येथील सरकारी उर्दू वरिष्ठ मुलींची शाळा क्र. 2 मधील शिक्षिका एस. एम. रायबागी यांनी स्वतःकडील तब्बल 80 हजार रुपये खर्च करून शाळेच्या आवारात बोअरवेल खोदण्याचे अतिशय स्तुत्य आणि आदर्शवत कार्य केले आहे. त्यांच्या या आदर्श कार्याला सहकारी शिक्षकांनीही उत्स्फूर्त पाठिंबा देत आनंद व्यक्त केला आहे.
बैलहोंगल शहरातील सरकारी उर्दू वरिष्ठ मुलींची शाळा क्र. 2 मधील विद्यार्थिनींना गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते.
ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी त्याच शाळेतील शिक्षिका एस. एम. रायबागी यांनी स्वतःकडील तब्बल 80 हजार रुपये खर्च करून शाळेच्या आवारात बोअरवेल खोदली.
बोअरवेलला सुमारे 2 इंच पाणी लागताच शाळेतील मुलींनी जल्लोष तर केलाच शिवाय शिक्षकांनी देखील मोठा आनंद व्यक्त केला. सदर शाळेत सुमारे 200 विद्यार्थिनी शिक्षण घेत असून 9 शिक्षक त्यांना अध्यापन करत आहेत. शिक्षिका एस. एम. रायबागी यांच्या स्तुत्य कार्याला त्यांचे सहकारी शिक्षक, शाळेचे एसडीएमसी सदस्य, बैलहोंगलचे शिक्षणाधिकारी ए. एन. पॅटी आणि स्थानिक नागरिकांनी पाठिंबा देऊन आनंद व्यक्त केला आहे.
आपल्या कार्याबद्दल बोलताना शिक्षिका रायबागी यांनी शाळेतील मुलींना अनेक दिवसांपासून पाण्याची समस्या भेडसावत होती त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून देण्याच्या स्वरूपात मी छोटी मदत केली आहे असे सांगून या कामात माझ्या सहकारी शिक्षकांनीही खूप साथ दिली. ज्यामुळे बोअरवेल खोदण्याचे काम यशस्वी झाले, असे कृतज्ञापूर्वक नमूद केले.


