बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्याच्या हुक्केरी तालुक्यातील इंगळी गावामध्ये हिंदू कार्यकर्त्यांवर प्राणघात हल्ला करणाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांना कायदेशीर कठोर शिक्षा दिली जावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या बेळगाव जिल्हा शाखेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या (एसपी) कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन करून भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना सादर केले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी निवेदनाचा स्वीकार करून सदर प्रकरणी चौघा जणांना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती देताना दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.
हुक्केरी तालुक्यातील इंगळी गावामध्ये हिंदू कार्यकर्त्यांवर नुकत्याच झालेल्या प्राणघात हल्ल्याच्या घटनेचा भारतीय जनता पक्ष तीव्र निषेध करते. इंगळी येथे हिंदुत्ववादी संघटनेच्या पाच कार्यकर्त्यांनी गोशाळेतून गाईंना घेऊन जाणाऱ्याला अडवून जाब विचारला असता संबंधित दलालांनी त्या हिंदू कार्यकर्त्यांना झाडाला बांधून जबर मारहाण केली.

सदर कृत्याचा व्हिडिओ नुकताच समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला आहे. सदर घटना यमकणमर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मारहाणीच्या घटनेनंतर पीडित हिंदू कार्यकर्ते पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात गेले असता त्यांना अर्वाच्य शिवीगाळ करून तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ करण्यात आली. पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली असे वर्तन केले हे समजले पाहिजे. तसेच मारहाणीच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले कठोर कारवाई केली जावी.
याखेरीज तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या यमकणमर्डी पोलीस ठाण्याच्या संबंधित अधिकाऱ्यावरही कायदेशीर कारवाई करून हल्ला झालेल्या हिंदू कार्यकर्त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशा आशयाचा तपशील जिल्हा पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आलेला निवेदनात नमूद आहे.


