प्रत्येक ब्रिजच्या ठिकाणी बळ्ळारी नाला स्वच्छतेला प्रारंभ

0
20
 belgaum

बेळगाव लाईव्ह :सध्याच्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून होत असलेल्या वाढत्या मागणीची दखल घेत बेळगाव महापालिकेकडून आजपासून बळ्ळारी नाला स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून पावसाचे पाणी तुंबू नये यासाठी नाल्यावरील पुलांच्या ठिकाणी ही स्वच्छता केली जात आहे. महापालिकेच्या या नाला स्वच्छता मोहिमेमुळे शेतकऱ्यात समाधान व्यक्त होत आहे.

धामणे रोड, यरमाळ रोड, येळ्ळूर रोडसह अन्य ठिकाणच्या ब्रिज परिसरात बळ्ळारी नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात तागाचे गवत, झुडपं आणि जलपर्णी फोफावली आहे.

त्यामुळे जोरदार पावसात पाणी निचरा होऊन पुढे जाण्याऐवजी येथेच तुंबून आसपासच्या शेतामध्ये पसरत असते. वेळीच नाला स्वच्छ केला नाही तर दरवर्षीप्रमाणे वडगाव, येळ्ळूर, जुने बेळगाव, शहापूर, कुडची वगैरे शिवारांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन पिकांचे विशेष करून भात पिकाचे पर्यायाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. त्यासाठी या नाल्याची ताबडतोब स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी रमाकांत कोंडुसकर, नारायण सावंत, कीर्तीकुमार कुलकर्णी वगैरे शेतकरी नेत्यांसह समस्त शेतकरी बांधवांकडून केली जात होती.

 belgaum

याची दखल घेत बेळगाव महापालिकेकडून आज गुरुवारपासून धामणे रोड येथील ब्रिजच्या ठिकाणी बळ्ळारी नाल्याची स्वच्छता करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शेतकरी नेते रमाकांत कोंडुसकर, कीर्तीकुमार कुलकर्णी आदींसह प्रमुख शेतकऱ्यांच्या उपस्थितीत स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झाली असून जेसीबीच्या सहाय्याने झुडपे, तागाचे रान, जलपर्णी आणि गाळ काढून नाल्याचा प्रवाह खुला केला जात आहे.

याप्रसंगी बेळगाव लाईव्ह समोर प्रतिक्रिया व्यक्त करताना एक शेतकरी नेते म्हणाले की, बेळगाव महापालिकेकडून आतापर्यंत छोटे छोटे नाले स्वच्छ करण्यात आले आहेत. मात्र या प्रमुख बळ्ळारी नाल्याची प्रथम स्वच्छता स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे छोटे छोटे नाले स्वच्छ करून देखील त्या ठिकाणी पाणी साचून राहत आहे.

तथापी आजपासून या ठिकाणी बळ्ळारी नाल्याच्या स्वच्छतेला सुरुवात झाली आहे. जेसीबीच्या सहाय्याने ब्रिजच्या ठिकाणी वाढलेला गाळ काढून तुंबलेल्या पाण्याला वाट करून देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, या पद्धतीने तूर्तास संपूर्ण नसला तरी ब्रिजच्या ठिकाणी बळ्ळारी नाल्याच्या स्वच्छतेला सुरुवात झाल्यामुळे शेतकरीवर्गात समाधान व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.