बेळगाव लाईव्ह : आषाढी वारी अवघ्या 15 दोन आठवड्यावर येऊन ठेपली असताना महाराष्ट्रातील पंढरपूर येथे बेळगावच्या एका भाविकाचा चंद्रभागा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना आज शुक्रवारी सकाळी 7 च्या सुमारास घडली.
मयत दुर्दैवी भाविकाचे नाव शुभम पावले (वय 27 वर्षे, रा. अलतगा बेळगाव) असे आहे. आपल्या मित्रांसोबत श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला गेलेला शुभम हा आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तेथील श्री पुंडलिक मंदिराजवळ चंद्रभागा नदीच्या पात्रात आंघोळीसाठी उतरला होता.

त्यावेळी पात्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो नदीत वाहून गेला. या घटनेमुळे नदी काठावर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर प्रशासन व स्थानिक बचाव पथकाने 4 तासाच्या शोध मोहिमेनंतर शुभम पावले याचा मृतदेह नदीतून बाहेर काढला.
शुभम हा आपल्या चौघा मित्रांसह नदीत अंघोळीसाठी उतरला होता चौघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले मात्र तिघांना वाचवण्यात आले अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
आषाढी यात्रेच्या तोंडावर चंद्रभागा नदीमध्ये पवित्र सणासाठी भाविकांची गर्दी होत आहे. तरी प्रशासनाने या ठिकाणी जीव रक्षक यंत्रणा सज्ज ठेवावी अशी मागणी भाविकांमधून होत आहे.




