बेळगाव लाईव्ह : संयुक्त महाराष्ट्र सीमा समितीने पुकारलेल्या कन्नड सक्तीविरोधी आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना रविवार, 1 जून रोजी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली अभिवादन करण्यात आले. यावेळी, सीमाभागातील मराठी भाषिकांनी पक्षभेद विसरून भाषेच्या मुद्द्यावर एकजुटीने संघर्ष करण्याचे आवाहन करण्यात आले.
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी यावेळी भाषणातून सीमावासियांचा लढा अधिक तीव्र करण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, “सीमावासियांचा हा लढा महाराष्ट्रात जाण्यासाठी सुरू आहे. आम्ही मराठी भाषिक आहोत. अन्यायाने डांबण्यात आलेल्या सीमाभागातील गावांच्या सोडवणुकीसाठी गेल्या ७० वर्षांपासून आमचा लढा सुरू आहे.
किणेकर यांनी महाराष्ट्राच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “ज्या महाराष्ट्रात जाण्यासाठी आज आपण लढत आहोत, तो महाराष्ट्र आज आपल्या पाठीशी आहे का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. सीमाभागात अनेकांनी हौतात्म्य पत्करूनही हा प्रश्न सुटला नाही. महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने सीमाप्रश्नी खटल्याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे, त्याप्रमाणे तो केला जात नाही, हे सीमावासियांचे दुर्दैव आहे.” ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्र सरकार आपल्या पाठीशी असो वा नसो, आता प्रत्येक सीमावासियाने या लढ्यासाठी लढणे गरजेचे आहे. यासाठी आता प्रत्येकाने पक्षभेद आणि मतभेद विसरून एकजुटीने लढणे आवश्यक आहे.”
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी यावेळी सांगितले की, पक्ष वेगळे असले तरी भाषेच्या मुद्द्यावर सर्व मराठी भाषिकांनी एकत्र येऊन संघर्ष करणे महत्त्वाचे आहे. भाषिक अन्यायाविरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे आणि प्रत्येकाच्या मनात संघर्षाची ज्वाला तेवत राहिली पाहिजे. त्यांनी कायदेशीर लढ्यालाही सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
1 जून 1986 रोजी संयुक्त महाराष्ट्र सीमा समितीच्या वतीने कन्नड सक्तीविरोधात आंदोलन पुकारण्यात आले होते. कर्नाटक सरकारने सीमाभागातील मराठी भाषा संपवण्यासाठी शाळांमध्ये कन्नड सक्ती करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे मराठी भाषिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. राणी चन्नम्मा चौकात शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या आंदोलनावेळी, पवार यांच्या अटकेमुळे आंदोलनाला उग्र रूप आले. पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, पण मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून प्रत्युत्तर दिले. या आंदोलनात एकूण ९ सीमावासियांना हौतात्म्य आले होते. या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 1 जून रोजी अभिवादन करण्यात येते.
यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, मालोजीराव अष्टेकर, दिगंबर पाटील, रमाकांत कोंडुसकर, माजी महापौर सरिता पाटील, रेणू किल्लेकर, प्रकाश शिरोळकर, राजकुमार बोकडे, रणजीत चव्हाण पाटील, मुरलीधर पाटील, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, माजी जि.प. सदस्या सरस्वती पाटील, ऍड. राजाभाऊ पाटील, सतीश पाटील, अमर येळ्ळूरकर, सुधीर चव्हाण, चंद्रकांत कोंडुसकर, डी. बी. पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.