बेळगाव लाईव्ह :नियोजित कित्तूर मार्गे बेळगाव ते धारवाड रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांच्या भूसंपादित केल्या जाणाऱ्या जमिनीला योग्य दर द्यावा. तसेच शेतकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी भूसंपादित केल्या जाणाऱ्या जमिनीमध्ये आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात, अशी मागणी बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी आणि हुलीकट्टी गावच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच मागणीची पूर्तता न झाल्यास जमिनी देण्यास नकार देऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारामध्ये आज शुक्रवारी सकाळी मोठ्या संख्येने जमलेल्या हिरेबागेवाडी आणि हुलीकट्टी गावच्या शेतकऱ्यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार करून मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असे आश्वासन दिले.
कित्तूर मार्गे उभारण्यात येणाऱ्या 73 कि.मी. अंतराच्या बेळगाव ते धारवाड नव्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. भूसंपादित केल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनींची किंमत निश्चित करण्यासंदर्भात गेल्या मे महिन्यात एम के हुबळी येथे पार पडलेल्या बैठकीस आम्ही शेतकरी हजर होतो. त्यावेळी रेल्वे मार्गासाठी भूसंपादित केल्या जाणाऱ्या हिरेबागेवाडी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीची एकरी किंमत 45 लाख रुपये इतकी तर हुलीकट्टी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीची एकरी 35 लाख रुपये इतकी कमी वैज्ञानिक किंमत निश्चित करण्यात आली.

भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसन कायदा 2013 मध्ये योग्य भरपाई आणि पारदर्शकतेचा अधिकार दिला आहे त्याची अंमलबजावणी केली जावी. या खेरीज आमच्या जमिनींना योग्य किंमत देण्याबरोबरच रेल्वे मार्गाची निर्मिती करताना सर्व्हिस रोड, पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक गटारी -नाले वगैरे आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात.
थोडक्यात या नव्या रेल्वे मार्गामुळे शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जावी. यासाठी आम्ही केलेल्या मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन आम्हाला दिले जावे, जर आमच्या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर भूसंपादनाला विरोध दर्शवून आम्ही तीव्र आंदोलन छेडू, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी हिरेबागेवाडी आणि हुलीकट्टी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.