बेळगाव लाईव्ह :बेळगावची हरहुन्नरी युवा कलाकार अनुष्का अक्षय आपटे हिने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘प्रायोगिक संगीत नाटकातील सर्वोत्कृष्ट गायिका अभिनेत्री’ हा प्रतिष्ठित पुरस्कार पटकावून बेळगाव शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
पुरस्कार विजेत्या ‘संगीत आनंदमठ’ नाटकातील शांतीच्या भूमिकेतील अनुष्का आपटे हिच्या उत्कृष्ट कौतुकास्पद अभिनयाने सर्वांची मने जिंकल्यामुळे तिला ‘प्रायोगिक संगीत नाटकातील सर्वोत्कृष्ट गायिका अभिनेत्री’ पुरस्कार प्रदान केला गेला. अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात संगीत आनंदमठ या नाटकाला देखील ‘सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संगीत नाटक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यामुळे या नाटकाच्या लेखक, दिग्दर्शक, निर्माते कलाकार वगैरे सर्वांसाठी हा दुहेरी आनंद होता. संगीत आनंदमठ नाटकातील अनुष्का हिचे भावपूर्ण गायन, सुंदर नृत्य आणि रंगमंचावरील प्रभावी उपस्थिती खरोखरच आगळी होती. तीव्र भावना आणि शास्त्रीय कौशल्याची आवश्यकता असलेल्या भूमिकेतील तिच्या सहज सुंदर सादरीकरणाने एक अनुभवी नाट्य कलाकार म्हणून तिने आपली क्षमता सिद्ध केली.

बेळगावमध्ये अनुष्का आपटे हिचा नाट्यक्षेत्रातील प्रवास बाल वयातच सुरू झाला. त्यानंतर अलीकडच्या काळात ती मराठी संगीत रंगभूमीवर आजच्या युवा पिढीचा एक मजबूत आवाज म्हणून उदयास आली आहे. तिने यापूर्वी संगीत सौभद्र, संगीत शारदा, संगीत स्वयंवर आणि इतर अनेक शास्त्रीय नाटकांमध्ये मुख्य भूमिका करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे.
आता आपल्या कौतुकाच्या यादीत भर घालत अनुष्काने महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत शांतीच्या भूमिकेसाठी प्रतिष्ठित रौप्य पदक जिंकले असून जे तिच्या उल्लेखनीय प्रतिभेचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे. अनुष्का अक्षय आपटे हिची अलीकडील राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील ओळख केवळ एक वैयक्तिक मैलाचा दगड नाही तर बेळगावच्या समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी एक तेजस्वी क्षण आहे, असे म्हंटल्यास वावगे ठरू नये.