बेळगाव लाईव्ह : एअर इंडिया विमान दुर्घटनेतील मृतांमध्ये बेळगावचे माजी विद्यार्थी डॉ. प्रतीक जोशी यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा समावेश असून त्यांचा अंतिम सेल्फी समोर आला आहे. अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातात बेळगाव मधील जवाहरलाल वैद्यकीय महाविद्यालय अर्थात जेएनएमसीचे माजी विद्यार्थी प्रतीक जोशी यांच्यासह त्यांची पत्नी आणि तीन मुलांचा दुर्दैवी अंत झाला आहे.
बेळगावातील केएलई संस्थेच्या जेएनएमसी महाविद्यालयाचे (2000-2005 बॅच) एमबीबीएस पदवीधर डॉ. प्रतीक जोशी हे लंडन येथे 2021 मध्ये स्थलांतरित झाले होते. डॉ. जोशी हे त्यांच्या पत्नी डॉ. कोमी, त्यांची 8 वर्षांची मुलगी मिराया आणि 5 वर्षांची जुळी मुले नकुल आणि प्रद्युत यांच्यासोबत काल गुरुवारी दुपारी एअर इंडियाच्या बोईंग 787 विमानाने प्रवास करत होते. विमानात चढण्यापूर्वी काही क्षण आधी या कुटुंबाने मित्र आणि नातेवाईकांसोबत एक आनंदी सेल्फी शेअर केला होता. ही जोशी कुटुंबाची हृदयद्रावक शेवटची आठवण असून जी आता व्हायरल झाली आहे.
डॉ प्रतीक यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे दुःखी झालेल्या जेएनएमसीच्या प्राचार्या डॉ. निरंजना शेट्टी म्हणाल्या की, प्रतीक जोशी एक हुशार विद्यार्थी होता. त्याच्या स्वभावामध्ये सर्वांशी जुळवून घेण्याची गुणवत्ता होती. राजस्थानचा रहिवासी असलेल्या डॉ. प्रतीक यांने बेळगाव येथील जेएनएमसी येथून एमबीबीएस केले. वैद्यकीय क्षेत्रात तो खूप कांही साध्य करत होता. माझ्या विद्यार्थ्यांचा हा दुर्दैवी मृत्यू हृदयाला पीळ पाडणारा आहे.
देव मृतांच्या आत्म्यांना शांती आणि जोशी कुटुंबाला दुःखाच्या डोंगरातून सावरण्याची ताकद देवो. मयत प्रतीकच्या मैत्रिणी डॉ. ज्योती बेनी आणि डॉ. मानसी गोसावी यांनी देखील आपल्या मित्रासह त्याच्या कुटुंबाच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आहे. ते आमच्या बाकावर बसायचे आमच्या बॅचचा रौप्य महोत्सव येत्या सप्टेंबरमध्ये साजरा होणार होता. डॉ. प्रतीक जोशी यांनी आपण त्या कार्यक्रमाला निश्चितपणे हजेरी लावू असे सांगितले होते.
व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ते सतत आमच्या संपर्कात असायचे असे सांगून आता प्रतीक शिवाय आम्हाला रौप्य महोत्सव साजरा करावा लागणार आहे, असे डॉ. बेनी आणि डाॅ. गोसावी यांनी निराशेने सांगितले.