वकिलांवरील हल्ल्याविरोधात बेळगावात तीव्र आंदोलन

0
6
 belgaum

बेळगाव लाईव्ह : रायबाग आणि गोकाकमध्ये वकिलांवर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ बेळगावात शेकडो वकिलांनी तीव्र आंदोलन छेडले. आरोपींना तत्काळ अटक करावी आणि वकिलांच्या सुरक्षेसाठी कायदेशीर पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

रायबागमधील वकिल संतोष पाटील यांच्या खुनाच्या आणि गोकाकमध्ये गिडनवर नावाच्या वकिलावर झालेल्या हल्ल्याच्या घटनांनी वकिल समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनांचा तीव्र निषेध करत आणि आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी बेळगावातील चन्नम्मा चौकात मोठ्या प्रमाणात वकिलांनी निदर्शने केली.

न्यायालयाचे कामकाज थांबवून वकिलांनी चन्नम्मा चौकात एकत्र येत घोषणाबाजी करत आरोपी अजूनही मोकाट असल्यामुळे आंदोलक वकिलांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. वकिलांना संरक्षण मिळावे, यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी आंदोलकांनी केली.

 belgaum

या आंदोलनाचे नेतृत्व करताना बेळगाव वकील संघटनेचे अध्यक्ष एस. एस. किवडसन्नवर यांनी सांगितले की, सरकार वकिलांच्या सुरक्षेसंदर्भात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी लक्ष घालून वकिल संरक्षण कायदा त्वरित लागू करावा, अशी मागणी त्यांनी केली.

रायबाग वकील संघटनेचे अध्यक्ष पी. एम. दरूर यांनी सांगितले की, संतोष पाटील यांचा खून एप्रिलमध्ये झाला असून, त्यानंतर अनेकदा आंदोलने करूनही पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही. मृत वकिलाच्या कुटुंबीयांनी चार वकिलांवर खुनाची सुपारी दिल्याचा आरोप केला असून, या पार्श्वभूमीवर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणीही त्यांनी केली.

या आंदोलनात वकील श्रीधर मुतगेकर यांनी राज्यभरात वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांचा उल्लेख करत सरकारवर जोरदार टीका केली. पोलिसांनी तात्काळ कार्यवाही केली असती, तर अशा घटना रोखता आल्या असत्या, असे त्यांनी सांगितले.

या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. या निदर्शनात बेळगाव वकील संघटनेचे अध्यक्ष एस. एस. किवडसन्नवर, एन. आर. लातूर, सुमित अगसगी यांच्यासह शेकडो वकिलांनी सहभाग नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.