बेळगाव लाईव्ह : बेळगावातील अशोकनगर येथे असलेल्या फुलबाजारात शासनाच्या फलोत्पादन विभागाने सुरू केलेल्या नवीन लिलाव प्रक्रियेमुळे विद्यमान व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दशकेभर फुलव्यवसायात असलेल्या या व्यापाऱ्यांनी नवख्या लोकांना जागा देण्याच्या धोरणाला विरोध करत, ‘आमचं अस्तित्व धोक्यात आलंय’ असा ठपका शासनावर ठेवला आहे.
गांधीनगरमधील मूळ बाजार हटवून शासनाने अशोकनगरमधील जागी सर्व व्यापाऱ्यांना स्थलांतरित केलं होतं. त्या वेळी अनेकांनी मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करत नव्या जागी व्यवसाय उभा केला. “प्रत्येक महिना १५ हजार रुपये भाडं भरूनही आम्हाला कायम अस्थिरतेचं वातावरण झेलावं लागतं,” अशी भावना एका ज्येष्ठ फुलव्यापाऱ्याने व्यक्त केली.
लिलाव प्रक्रियेद्वारे नव्यांना संधी दिल्यास, आधीच अडचणीत असलेल्या आमच्या व्यवसायावर घाला येईल, आणि ही ‘अस्थिरता’ अधिक तीव्र होईल, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. “आमच्यासाठी हे फक्त दुकान नाही, तर आमच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे. आम्हाला हटवण्याचा किंवा डावलण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर फुलबाजार भरवू,” असा थेट इशाराही देण्यात आला आहे.

या वादामागे फक्त जागेचा प्रश्न नाही, तर पारंपरिक व्यवसायांमध्ये निर्माण होणारी असुरक्षितता आणि धोरणात्मक दुर्लक्ष यांचा गाभा आहे. शासनाच्या ‘सर्वांना संधी’ या धोरणाचा आदर ठेवत, विद्यमान व्यापाऱ्यांचे हक्कही सुरक्षित ठेवावेत, अशी मागणी आता जोर धरत आहे.
तणाव वाढल्यामुळे प्रशासन काय निर्णय घेते आणि या संघर्षाला कोणता तोडगा निघतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.