बेळगाव लाईव्ह :सिद्धकलानगर, अनगोळ येथील एका मूर्तीशाळेतून तब्बल 7 क्विंटल वजनाच्या घोड्याच्या कांस्य (ब्रांझ) मूर्ती चोरी प्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी दोघा विद्यार्थ्यांना अटक केली असून त्यांच्याकडून 1 लाखाहून अधिक किमतीच्या वितळवलेल्या कांस्य धातूसह बोलेरो मॅक्स, एक दुचाकी वगैरे एकूण 6 लाख 70 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे गौतम अजित देसाई (वय 19, रा. महावीर गल्ली कुट्टलवाडी) आणि रवी सुरेश अरळप्पणावर (वय 19, रा. ब्रह्मानगर मजगाव) अशी असून हे दोघेही विद्यार्थी आहेत. या प्रकरणाची माहिती अशी की, सिद्धकलानगर, अनगोळ येथील एका मूर्तीशाळेतून गेल्या दि. 2 मे रोजी सायंकाळी 5:30 पासून दि. 3 मे च्या सकाळी 6 वाजेपर्यंतच्या वेळेत घोड्याच्या कांस्य धातूच्या सुमारे 8 लाख रुपये किमतीच्या मूर्तीची चोरी करण्यात आली होती.
याप्रकरणी दिव्या सागर पोतदार (रा. भांदुर गल्ली अनगोळ) यांनी दि. 19 मे रोजी टिळकवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर चोरीचा छडा लावण्यासाठी शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग, पोलीस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था) रोहन जगदीश, पोलीस उपायुक्त (गुन्हे व रहदारी) एन. निरंजनराज अरस आणि खडेबाजार उपविभागाचे सहाय्यक पोलीस उपायुक्त शेखर एच. यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती.

सदर पोलीस पथकाने काल शुक्रवारी या चोरी प्रकरणाचा संपूर्ण छडा लावताना गौतम देसाई व सुरेश अरळप्पणावर या दोघांना अटक केली. घोड्याची मूर्ती चोरल्यानंतर त्यातील कांस्य धातू मिळवण्यासाठी ती वितळवण्यात आली होती, ते वितळवलेले सुमारे 1 लाख 10 हजार 700 रुपये किमतीचे 246 किलो कांस्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचप्रमाणे चोरीसाठी वापरण्यात आलेली 5 लाख रुपये किमतीची बोलेरो मॅक्स गाडी व 60 हजार रुपये किमतीची एक डिओ स्कूटर असा एकूण 6 लाख 70 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी, पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ घंटामठ, महेश पाटील, एस. एम. कर्लिंगनावर, लाडजीसाब मुलतानी, नागेंद्र तळवार, सतीश गिरी, महंमद लष्करी, तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, महादेव काशीद आदींचा समावेश असलेल्या पथकाने उपरोक्त कारवाई केली. याबद्दल या पथकाचे शहर पोलीस आयुक्तांनी अभिनंदन करून शाबासकी दिली आहे.