बेळगाव लाईव्ह : सध्याच्या ‘संदीग्ध परिस्थितीत’ कोणीही सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमातून खोटी किंवा अफवा पसरवणारी माहिती पसरविल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या आदेशानुसार, सद्यस्थितीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी नुकतीच एक बैठक घेण्यात आली होती, अशी माहिती डॉ. गुळेद यांनी दिली.
ते म्हणाले की, जिल्हयातील प्रमुख मंदिरे आणि जलाशयांच्या ठिकाणी यापूर्वीच सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यासोबतच, जिल्ह्यातील प्रमुख कारखान्यांनाही योग्य ती सुरक्षा व्यवस्था पुरवली जाईल. यामध्ये विशेषतः गॅस निर्मिती करणाऱ्या कारखान्यांचा समावेश असेल.

समाजात जातीय सलोखा बिघडवणारे किंवा तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट्स पोलीस प्रशासनाने तातडीने शोधून हटविल्या आहेत. जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या १४ पेजेसवरील आक्षेपार्ह पोस्ट्स डिलीट करण्यात आल्या आहेत. तसेच, खबरदारीचा उपाय म्हणून एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्हा दोन राज्यांच्या सीमेला लागून असल्याने येथे विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा पोलीस प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.