बेळगाव लाईव्ह: संती बस्तवाड धर्मग्रंथ विटंबना प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना महिन्यापूर्वी त्याच गावात धार्मिक स्थळाच्या फरशा फोडल्या प्रकरणातील चौघांचा शोध लागला असून ग्रामीण पोलिसांनी महिन्याभरापूर्वी घटलेल्या घटनेतील चौघा संशयितांना अटक केली आहे.
बेळगाव पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी आयोजित पत्रकार परिषदेत महिन्याभरापूर्वी घडलेल्या घटनेतील चौघांना अटक केल्याची माहिती दिली मात्र अद्याप धर्मग्रंथ विटंबना प्रकरणातील आरोपींना अटक केली नसून त्याप्रकरणी अजून सखोल तपास करण्याची गरजही व्यक्त केली. पत्रकार परिषदेला उत्तरचे आमदार असिफ सेठ देखील उपस्थित होते.
पोलिसांनी लक्ष्मण यल्लाप्पा उचवाडे वय 23, मुतप्पा भरमा उचवाडे वय 26, लक्ष्मण नागप्पा नाईक वय 30 आणि शिवराज यल्लाप्पा गुदली वय 29 सर्वजण राहणार संतीबस्तवाड तालुका बेळगाव अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.
सध्या संती बस्तवाड धर्मग्रंथ विटंबना प्रकरणाचा तपास जोरदारपणे सुरू असून यासाठी पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली अशी माहिती देताना पोलीस आयुक्तांनी संती बस्तवाड महिन्या भरापूर्वी युवती बेपत्ता प्रकरणी पोलीस निरीक्षकांकडून कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष झाले नसल्याचा स्पष्टीकरण त्यांनी दिले.
उद्या शुक्रवारी बेळगाव शहर परिसरातील मुस्लिम बांधवांकडून होणाऱ्या आंदोलना संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा करत असून पोलिसांना सहकार्य करून शांतता राखण्यास मदत करा असे आवाहन केले आहे त्याला मुस्लिम समाजातील नेत्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान बेळगाव शहरातली कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी 3000 पोलिसांचा बंदोबस्त देखील राहणार असल्याचे पोलीस आयुक्त म्हणाले. शांततेत मुस्लिम समाजाचे आंदोलन होणार असेल तर त्याला परवानगी आहे मात्र संभाव्य आंदोलन पुढे ढकलावं यासाठी प्रयत्न करत आहोत त्याला देखील सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे असे त्यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना आमदार असिफ सेठ यांनी संती बस्तवाड घटनेबाबत राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची यासंदर्भात चर्चा केली असल्याचे सांगून याप्रकरणी पोलीस योग्य काम करत आहेत ते कृत्य कोणी केले आहे त्यांनाच पोलिसांनी जेरबंद करावे अशी आमची ठाम मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
धर्मग्रंथ विटंबना प्रकरणी समाज बांधवांच्या भावना तीव्र आहेत खंबीर आहेत, आंदोलन करणे लोकशाहीत घटनेने दिलेला अधिकार आहे आणि शांततेत आंदोलन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे जर शांततेत कुणी आंदोलन करणार असेल तर त्याला अडवता येणार नाही उद्या शुक्रवारी होणाऱ्या आंदोलनाबाबत समाज प्रमुख नेते मंडळींशी निर्णय करून योग्य तो निर्णय घेऊ असे त्यांनी नमूद केले.