बेळगाव लाईव्ह :मागील आठ दिवसांपासून सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः झोडपून काढल्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊन कांही ठिकाणी तर अनेकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान या पावसामुळे नदी नाले प्रवाहित झाल्याने येत्या काळात पाण्याची समस्या मिटणार यात शंका नाही. थोडक्यात हा पाऊस पाणी समस्या मिटविणारा ठरला आहे.
बेळगाव तालुक्यासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. या पावसामुळे मागील आठ दिवसात मशागत व पेरणीची कामे खोळंबली होती. संततधार पावसामुळे हा अवकाळी पाऊस की मान्सूनपूर्व पाऊस या विवंचनेत शेतकरी पडले असताना बेळगाव कर्नाटक, महाराष्ट्रसह मान्सूनचे आगमन झाल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
मान्सूनपूर्व पावसामुळे सध्या अनेक ठिकाणी नदी, नाले प्रवाहित झाले आहेत. बेळगाव तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेय नदीत कधी नव्हे ते मे महिन्यातच पाणी वाहू लागली असून नाले देखील प्रवाहित झाल्यामुळे काही अंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान मान्सूनपूर्व पावसाने अनेकांची दाणादाण उडवली आहे. या पावसामुळे शेती व मशागतीची कामे रखडल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
मागील वर्षांच्या तुलनेत यावर्षी मे महिन्यातच पावसाने हाहाकार माजवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान राकसकोप जलाशयातील पाणी पातळी स्थिर असली तरी नदी नाले प्रवाहित झाले आहेत.
सध्याचा पाऊस काही ठिकाणी मारक तर काही ठिकाणी पोषक वातावरण निर्माण करणारा ठरला आहे. भाजीपाला मात्र खराब झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मशागतीच्या कामासाठी हा पाऊस उत्तम ठरणार यात शंका नसल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे.