बेळगाव लाईव्ह ;ग्रामीण पाणी शाश्वततेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत प्यास फाउंडेशन संस्थेने जिनाबकुल फोर्जच्या सहकार्याने कंग्राळी बी.के. गावातील एका महत्वाच्या विहिरीचे यशस्वीरित्या पुनरुज्जीवन केले आहे.
कंग्राळी बी.के. येथे गेल्या मंगळवारी 13 मे रोजी आयोजित समारंभात पुनरुज्जीवीत नवी विहीर औपचारिकपणे कंग्राळी ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून जिनाबकुल फोर्ज प्रायव्हेट लिमिटेडचे किरण जिनगौडा आणि संतोष केलगेरी उपस्थित होते.
प्यास फाउंडेशनने गेल्या उन्हाळ्यात सुरू केलेल्या पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत 15 फूट खोलीपर्यंत विहीर खोदणे आणि तिची पाणी साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी जलसाठे पुनर्संचयित करणे हे समाविष्ट होते. या कामामुळे विहिरीची पाणी क्षमता लक्षणीयरीत्या सुधारली असून गावासाठी एक महत्त्वाचा जलस्रोत उपलब्ध झाल्यामुळे रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ही विहीर गावासाठी जीवनरेखा मानली जाते आणि तिचे पुनरुज्जीवन हे कंग्राळी बी.के.साठी पाणी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी एक मोठे पाऊल आहे. हस्तांतरण समारंभाप्रसंगी पंचायत विकास अधिकारी (पीडीओ) आणि कंग्राळी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षांनी दोन्ही संस्थांचे त्यांच्या योगदान आणि समर्पणाबद्दल मनापासून आभार मानले.
कार्यक्रमात बोलताना डॉ. माधव प्रभू यांनी सर्वांच्या सहकार्यात्मक प्रयत्नांचे कौतुक केले आणि सामुदायिक विकास व पर्यावरणीय शाश्वततेसाठी भविष्यातील प्रकल्पांना सतत पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. ग्रामपंचायत अध्यक्ष रोहिणी नाथबुवा यांनी प्यास फाउंडेशनच्या उपक्रमांची प्रशंसा केली. पीडीओ गोविंद रंगापगोळ यांनी विहिरीचे हस्तांतरण स्वीकारले आणि विहिरीची पुढील देखभाल करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रा.पं. सदस्य जयराम पाटील, यल्लोजी पाटील, प्यास फाउंडेशनचे प्रतिनिधी डॉ. प्रीती कोरे, अभिमन्यू डागा, दीपक ओळकर, सतीश लाड आणि सूर्यकांत हिंडलगेकर यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीपक ओऊळकर यांनी उपस्थितांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
हा प्रकल्प स्थानिक पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी एनजीओ-कॉर्पोरेट भागीदारी आणि तळागाळातील लोकांच्या सहभागाचे यशस्वी उदाहरण असून हे उदाहरण ग्रामीण समुदायांमध्ये शाश्वत हस्तक्षेपांचा परिणाम अधोरेखित करते.