बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बणयांग यांनी दिली. धक्कादायक म्हणजे, या प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.
मंगळवारी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना आयुक्त मार्टिन यांनी या प्रकरणाची माहिती दिली. बेळगाव शहराच्या बाहेरील एका रिसॉर्टमध्ये तीन अल्पवयीन मुलांनी मिळून या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. सुमारे दहा दिवसांपूर्वी ही घटना घडली होती.
एका अल्पवयीन मुलाने स्वतःच्या नावावर रिसॉर्टमधील खोली बुक केली होती. पीडित मुलीचा अल्पवयीन मित्र तिला त्या रिसॉर्टमध्ये घेऊन गेला होता. घरी परतल्यानंतर मुलीला पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर तिच्या आईने तिला रुग्णालयात नेले असता, वैद्यकीय तपासणीत ही घटना उघडकीस आली, असे आयुक्तांनी सांगितले.

याप्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीसह आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर या प्रकरणातील आणखी एका अल्पवयीन मुलाचा शोध सुरू आहे.
या गंभीर प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा सहभाग असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्या अटकेची शक्यता निर्माण झाल्याने पोलीस दलातही चर्चा सुरू आहे.