बेळगाव लाईव्ह :नवविवाहितेचा सासरच्या मंडळींनी खून केल्याच्या आरोपातून नवऱ्यासह एकाच कुटुंबातील 4 आरोपींची बेळगाव येथील पाचव्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती के. कात्यायीनी यांनी सरकारी पक्षाला गुन्हा सिद्ध न करता आल्यामुळे निर्दोष मुक्तता केली आहे.
मयत नवाविवाहितेचा नवरा सुरेश बसाप्पा अमटूर, सासू कस्तुरी बसाप्पा अमटूर, सासरे बसाप्पा मल्लाप्पा अमटूर आणि दीर महारुद्राप्पा बसाप्पा अमटूर (सर्व रा. कल्लापूर गल्ली, हळेहुंचीनकट्टी) अशी निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपींची नावे आहेत.
प्रकरणाची माहिती अशी की, सुरेश अमटूर याचा विवाह गेल्या 27 मे 2017 रोजी होगर्ती येथील गीता बसवराज कुरी हिच्याशी झाला होता. मात्र लग्नानंतर केवळ 6 महिन्यातच नवविवाहित गीताला घराबाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा नांदावयास आलेल्या गीताचा क्षुल्लक कारणावरून मारबडव करण्याद्वारे छळ करण्यात येत होता.
याची माहिती गीता आपल्या आई-वडिलांसह माहेरच्या मंडळींना देत होती. या गोष्टीचा राग धरून गीता हिचा खून करण्याच्या उद्देशाने 7 मे 2018 रोजी सायंकाळी 5 वाजता घरातील बेडरूममध्ये आरोपींनी गीताशी भांडण काढून जबर मारहाण करण्याद्वारे नाक व गळा दाबून तिचा खून केला. तसेच तिने फाशी लावून आत्महत्या केली असे भासवण्यासाठी खोलीतील पलंगावर लुंगी ठेवली.
तसेच खोलीच्या दरवाजाच्या कडीला आतल्या बाजूने मोबाईल चार्जरच्या वायरने बांधून मृत गीताने आतून कडी बंद करून आत्महत्या केली आहे असा गाजावाजा करत दरवाजा तोडून आरोपीने तिचा मृतदेह पलंगावरून खाली उतरवला.
सदर घटनेनंतर आपल्या मुलीच्या मृत्यूबद्दल संशय आल्याने गीताचे वडील बसवराज कल्लाप्पा कुरी (रा. होगर्ती, ता. बैलहोंगल) यांनी उपरोक्त चारही आरोपीं विरुद्ध आपल्या मुलीचा खून केल्याचा आरोप करत कित्तूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी घटनेचा तपास करत आरोपींविरुद्ध भा.द.वि. कलम 498 ए, 302, 201 सहकलम 34 अन्वये गुन्हा नोंद केला होता.
त्याचप्रमाणे तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर खटल्यात सरकारी पक्षातर्फे 17 साक्षीदार, 81 कागदोपत्री पुरावे आणि 13 मुद्देमाल हजर करून तपासण्यात आले. तथापि सरकारी पक्षाला गुन्हा सिद्ध न करता आल्यामुळे बेळगाव येथील पाचव्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती के. कात्यायीनी यांनी खटल्याची सुनावणी करत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींच्यावतीने ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. हेमराज बेंचण्णावर ॲड. शंकर बाळनाईक, ॲड. नारायण बागी, ॲड विकेश तेरदाळकर आणि ॲड. ज्योतिबा पाटील यांनी काम पाहिले.