बेळगाव लाईव्ह :कला फिल्म प्रोडक्शनतर्फे बेळगावमध्ये राजा श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि बेळवडी मल्लम्मा सावित्री यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपट तयार केला जाणार आहे. सदर 9 ते 10 कोटी रुपये बजेटच्या या चित्रपटाचे चित्रीकरण येत्या जानेवारी 2026 मध्ये सुरू होणार असून चित्रपटातील 70 ते 80 टक्के कलाकार हे स्थानिक बेळगावचे असतील, अशी माहिती चित्रपटाचे निर्माते मच्छे येथील लाईन प्रोडूसर प्रशांत पाटील यांनी दिली.
शहरात आज गुरुवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कला फिल्म प्रस्तुत राजा श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज व बेळवडी मल्लम्मा सावित्री यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण बेळगाव खानापूर व चंदगड तालुक्यामध्ये होईल.
याच तीन तालुक्यांमधील हौशी तसेच नवोदित कलाकारांना या चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. बेळगाव ही असंख्य शिवभक्त व शिवकन्या तसेच लाठीमेळा, तलवारबाजी, घोडस्वारी, मर्दानी खेळणे तरबेज व सक्षम अशी कलानगरी असल्यामुळे येथील कलाकारांना योग्य व्यासपीठ उपलब्ध केले जाईल. या ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण येत्या जानेवारी 2026 मध्ये सुरू होईल. चित्रीकरणाच्या आधी कलाकारांना चित्रीकरणाची माहिती व मार्गदर्शन केले जाईल. हा चित्रपट जुलै किंवा ऑगस्ट 2026 मध्ये आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे.

सदर चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी संगीतकार दिग्दर्शक व निर्माता अवधूत गुप्ते यांच्याशी चर्चा झाली आहे. अवधूत गुप्ते यांचे बेळगावशी जवळचे नाते असून बेळगावच्या कलाकारांबाबतचा त्यांचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असतो, त्यामुळे त्यांच्यावर दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. सदर चित्रपट मराठी व कन्नड अशा दोन भाषेमध्ये प्रदर्शित होणार असल्यामुळे याचे बजेट 9 ते 10 कोटी रुपये इतके आहे. या चित्रपटासाठी मीडिया पब्लिसिटी पार्टनर झी स्टुडिओ आहे. जिओ स्टुडिओच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील आपल हा चित्रपट जाईल.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची आपल्याला संपूर्ण साथ असल्यामुळे आपणच हा चित्रपटाची निर्मिती करायचा असा निर्णय मी घेतला. या ऐतिहासिक चित्रपटाच्या कथेवर आम्ही म्हणजे मी व लेखक ऋषिकेश कोळी गेली दोन वर्षे संशोधनात्मक काम करत आहोत. या चित्रपटांमध्ये स्थानिक कलाकारांना संधी देण्यात येणार असून त्यासाठीचे ऑडिशन्स येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होतील आणि त्यानंतर रीतसर कार्यशाळा देखील घेतली जाईल. चित्रपटाचा विषय बेळगावचा असल्यामुळे या चित्रपटातील 70 ते 80 टक्के नवोदित कलाकार हे बेळगाव मधील असतील. तसेच चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण बेळगाव, चंदगड आणि खानापूर परिसरात केले जाणार आहे.
चित्रपटाच्या लोकेशन्ससाठी रेकी करण्यात आली. ही करताना आम्हाला सपाट समतल प्रदेश हवा होता आणि त्यासाठी वैजनाथचा महिपाळगड परिसर, पाणी आटते त्यावेळी निर्माण होणारा हिडकल जलाशयातील सपाट प्रदेश वगैरे जागांची पाहणी केली आहे. चित्रपटातील वाड्याचे जे चित्रीकरण आहे त्यासाठी येळीमुन्नोळी येथील राजा लखमगौडा यांच्या वाड्याची पाहणी केली आहे अशी माहिती देऊन प्रशांत पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. पत्रकार परिषदेस प्रसाद पाटील व कला फिल्म प्रोडक्शनचे अन्य सदस्य उपस्थित होते.