बेळगाव लाईव्ह: भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार, बेळगाव जिल्हा रुग्णालयात आज वैद्यकीय सज्जतेचे व्यापक मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले होते. या मॉक ड्रिलमध्ये युद्धासारख्या आणीबाणीच्या परिस्थितीत जखमी सैनिकांवर आणि नागरिकांवर तातडीने उपचार कसे करावेत, याची रंगीत तालीम करण्यात आली.
या मॉक ड्रिल संदर्भात अधिक माहिती देताना बेळगाव जिल्हा शस्त्रचिकित्सक डॉ. विठ्ठल शिंदे यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार, आम्ही आज जिल्हा रुग्णालयात युद्धाजन्य परिस्थितीत उद्भवणाऱ्या वैद्यकीय आव्हानांना तोंड देण्यासाठी मॉक ड्रिल आयोजित केले होते.
यात अचानक मोठ्या संख्येने जखमी रुग्ण दाखल झाल्यास त्यांच्यावर त्वरित उपचार कसे करावेत, कोणत्या वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात आणि विविध विभागांमध्ये समन्वय कसा साधावा, याचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
मॉक ड्रिलमध्ये, रुग्णालयातील अपघात विभाग, शस्त्रक्रिया कक्ष, अतिदक्षता विभाग आणि इतर आवश्यक विभागांना सक्रिय करण्यात आले होते. जखमी रुग्णांना आणण्यासाठी रुग्णवाहिकांचा वापर करण्यात आला आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांची तपासणी करून उपचार सुरू केले. डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर पॅरामेडिकल स्टाफ यांनी मिळून शस्त्रक्रिया करणे, रक्तपुरवठा व्यवस्थापित करणे आणि आवश्यक औषधोपचार देणे यासारख्या प्रक्रियांचे प्रात्यक्षिक केले.
डॉ. शिंदे पुढे म्हणाले, या मॉक ड्रिलचा उद्देश रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांची तयारी तपासणे आणि कोणत्याही मोठ्या आपत्कालीन परिस्थितीत कमी वेळेत प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक सुधारणा करणे हा होता. यातून आम्हाला आमच्या यंत्रणेतील काही त्रुटी आणि सुधारणेच्या संधी दिसून आल्या आहेत, ज्यावर आम्ही लवकरच काम करणार आहोत. या मॉक ड्रिलमुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून, कोणत्याही गंभीर परिस्थितीत रुग्णांना सर्वोत्तम उपचार देण्यासाठी ते सज्ज असल्याचे दिसून आले.




