बेळगाव लाईव्ह : ‘भारत-पाकिस्तान’ दरम्यानच्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या आदेशानुसार बेळगाव शहर आणि परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत असून, येत्या २-३ दिवसांत मॉक ड्रील सुरू केले जाईल, अशी माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
देशातील सध्याच्या ‘युद्धसदृश्य’ परिस्थितीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना माहिती देताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले की, बेळगाव शहर आणि परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी अधिक दक्षता घेण्याचे आणि बंदोबस्त वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शहराच्या प्रत्येक चौकात सायरन लावण्यात येतील तसेच पोलीस आणि आरोग्य विभागाच्या सहकार्याने येत्या २-३ दिवसांत मॉक ड्रीलची अंमलबजावणी केली जाईल. रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत कोणती पावले उचलावी याबाबतही जागरूकता निर्माण केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
उत्तर कन्नड जिल्ह्यातील कैगा अणुऊर्जा प्रकल्पाबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली आहे, असेही त्यांनी नमूद केले. सद्यस्थिती लक्षात घेता प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.