बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील मेखळी येथील राममंदिर मठाचे लोकेश्वर स्वामीजी यांना एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या घटनेने धार्मिक आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बेळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुडलगी तालुक्यातील एका १७ वर्षीय पीडित मुलीला तिच्या घरी सोडण्याच्या बहाण्याने लोकेश्वर स्वामीजींनी १३ मे रोजी आपल्या गाडीत बसवले. पीडित मुलगी आणि तिचे वडील राममंदिर मठाचे भक्त होते आणि गेली दोन वर्षे आरोग्याच्या कारणांमुळे ते मठात येत होते. या ओळखीचा गैरफायदा घेत, स्वामीजींनी मुलीला घरी न सोडता बागलकोटमार्गे रायचूरकडे नेले.
रायचूर येथील एका लॉजमध्ये त्यांनी अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप आहे. बलात्कारानंतर स्वामीजींनी पीडित मुलीला महालिंगपूर बसस्थानकावर सोडून दिले आणि “घरी याबद्दल सांगितल्यास जिवंत सोडणार नाही,” अशी धमकीही दिली. भेदरलेल्या अवस्थेत मुलीने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर पीडित कुटुंबीयांनी रायबाग पोलीस ठाण्यात स्वामीजींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत लोकेश्वर स्वामीजींना अटक केली.


याबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या स्वामीजींविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मठात केलेल्या धाडसत्रामध्ये तलवारी, चाकू आणि इतर शस्त्रेही आढळून आली आहेत.
या शस्त्रास्त्रांबाबतही सखोल तपास केला जाईल. लॉजमधून आणि इतर संबंधित ठिकाणांहून आवश्यक माहिती गोळा केली जात आहे. सोमवारी न्यायालयात स्वामीजींच्या पोलीस कोठडीसाठी अर्ज केला जाईल, जेणेकरून त्यांची अधिक चौकशी करता येईल, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, अलिकडच्या काळात अशा ढोंगी स्वामीजींची संख्या वाढली आहे.
लोकांनी अशा व्यक्तींपासून सावध राहावे आणि आपल्या मुलांना अनोळखी व्यक्तींबरोबर, विशेषतः अशा धार्मिक स्थळांशी संबंधित व्यक्तींसोबत पाठवताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले.
या घटनेमुळे संपूर्ण कर्नाटकात खळबळ उडाली असून, मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.