बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेच्या शहापूर प्रभाग क्र. 27 चे नगरसेवक रवी साळुंखे यांच्या प्रयत्नांमुळे शहापूर नाथ पै सर्कल ते खासबाग बसवेश्वर सर्कल पर्यंतच्या मुख्य रस्त्याशेजारी गेल्या कित्येक महिन्यापासून तुंबून असलेल्या गटारीची स्वच्छता उद्यापासून युद्धपातळीवर केली जाणार असून त्या अनुषंगाने महापौर मंगेश पवार व महापालिकेच्या शहर अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर यांनी आज बुधवारी सकाळी पाहणी दौरा केला.
शहापूर नाथ पै सर्कल ते खासबाग बसवेश्वर सर्कल पर्यंतच्या रस्त्यावर महापालिकेचे भाजी मार्केट आहे. सदर रस्त्याशेजारी गटारे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बांधण्यात आली असली तरी त्यांची स्वच्छता करण्यासाठी सुमारे 20 ते 30 फुटावर एक याप्रमाणे गटार खुले ठेवून त्यावर झाकणे बसवण्यात आली आहेत.
त्यामुळे त्या 20 -30 फुटामध्ये साचलेला कचरा काढणे अवघड होऊन गटार तुंबण्याची समस्या निर्माण होत आहे. त्यासाठी सदर गटार संपूर्ण खुले करून त्याची एकदाच स्वच्छता केली जावी आणि त्यानंतर पुढे स्वच्छता करणे सुलभ जावे या पद्धतीने गटार बंदिस्त केले जावे अशी परिसरातील नागरिक, व्यापारी आणि भाजी विक्रेत्यांची गेल्या कित्येक महिन्यांपासूनची मागणी आहे.
याखेरीज खासबाग बसवेश्वर सर्कल येथील खुल्या नाल्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्यामुळे त्या ठिकाणी देखील सांडपाणी तुंबण्याची समस्या निर्माण होत आहे. या प्रकारामुळे स्वच्छता व दुर्गंधी निर्माण होऊन सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत असल्यामुळे ही समस्या निकालात काढण्यासाठी शहापूर प्रभाग क्रमांक 27 चे नगरसेवक रवी साळुंखे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. परवाच झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये देखील त्यांनी हा विषय मांडला होता.

यासंदर्भात आज बुधवारी सकाळी महापौर मंगेश पवार महापालिका शहर अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर आणि संबंधित अधिकाऱ्यांनी शहापूर नाथ पै सर्कल ते खासबाग बसवेश्वर सर्कल पर्यंतच्या रस्त्याच्या गटारीचा आणि नजीकच्या नाल्याचा पाहणी दौरा केला. यावेळी नगरसेवक रवी साळुंखे यांनी 20 ते 30 फुटांवर गटारीची झाकणे बसवण्यात आल्यामुळे कशा पद्धतीने गटार तुबण्याची समस्या निर्माण होते ते महापौर आणि शहर अभियंत्यांच्या निदर्शनास आणून देऊन त्याबद्दल माहिती दिली.
त्याचप्रमाणे बसवेश्वर सर्कल येथील नाल्याची समस्या देखील त्यांच्या निदर्शनास आणून दिली. सदर समस्या जाणून घेऊन महापौर मंगेश देसाई यांच्यासह मनपा शहर अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांनी तात्काळ उद्या गुरुवारपासून गटार खुले करून स्वच्छतेचे काम हाती घेतले जाईल. त्याचप्रमाणे बसवेश्वर सर्कल येथील नाल्याच्या बाबतीतही योग्य ती उपाययोजना केली जाईल असे ठोस आश्वासन दिले आहे. याप्रसंगी महापौर आणि शहर अभियंत्यांसमवेत सहाय्यक कार्यकारी अभियंता सचिन कांबळे, आरोग्य निरीक्षक शिल्पा कुंभार, कनिष्ठ अभियंता मंजुनाथ गडाद आदी संबंधित अधिकारी मुकादमासह इर्शाद अनगोळकर वगैरे स्थानिक नागरिक, दुकानदार, व्यापारी उपस्थित होते.
शहापूर नाथ पै सर्कल ते खासबाग बसवेश्वर सर्कल दरम्यानच्या गटारीची स्वच्छता होणार असल्यामुळे परिसरातील नागरिकात समाधान व्यक्त होत असून ते नगरसेवक रवी साळुंखे यांची प्रशंसा करत आहेत.