बेळगाव लाईव्ह :गेल्या दिवसांमध्ये पडलेल्या पावसामुळे काहीसा गारवा निर्माण झाला होता. मात्र आता पुन्हा उष्म्यात वाढ होवून पारा 37 अंश सेल्सिअस वर पोहोचल्याने अंगाची काहीली वाढली आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण झाले असल्यामुळे गारव्यासाठी शहरवासीय पुन्हा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
सध्या उष्म्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या महिन्यात पारा सातत्याने 37 अंशाचा टप्पा गाठत आहे. हवामान खात्याने तर मे महिन्यात उष्म्याचे प्रमाण उच्चांकी असेल असा अंदाज वर्तवला आहे. वाढत्या उष्म्यामुळे अनेकांवर चर्म आजारांना सामोरे जाण्याची वेळ येत आहे.
गर्मीपासून दिलासा मिळण्यासाठी नागरिकांना घर आणि कार्यालयातील आपले पंखे, कुलर, एसी सतत सुरू ठेवावे लागत आहेत. बाजारात शीतपेय आणि आईस्क्रीमची मागणी वाढली असून ठीक ठिकाणच्या पानपोईंच्या ठिकाणी तहानलेल्यांची गर्दी पहावयास मिळत आहे.
बेळगाव हे दुसरे महाबळेश्वर म्हणून ओळखले असले तरी याच महाबळेश्वरमध्ये पारा उच्चांकी होताना दिसत आहे. आणखी कांही दिवसात शहराचा पारा 38 अंशावर जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्याच घराबाहेर पडणे कठीण झाले असताना उष्मा आणखी वाढल्यास ओढवणाऱ्या परिस्थितीतची चिंता नागरिकांना लागली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदा देखील बेळगाव जिल्ह्यासह तालुक्यात पाण्याची समस्या भडसावण्यास सुरुवात झाली आहे. मध्यंतरी 8 ते 10 दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली. मात्र वादळी वाऱ्यासह पावसाने आगमन झाल्याने जमिनीत म्हणावा तसा ओलावा झाला नाही.
परिणामी जमिनीखालील पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याच्या समस्या निर्माण होत त्यात आता वाढत्या उष्म्याची भर पडत असल्यामुळे यातून सुटका कधी होणार? अशीच सार्यांना चिंता लागून आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार बेळगावचा पारा सरासरी किमान 21 तर कमाल 36 अंशावर असला तरी त्यात दररोज काही प्रमाणात बदल होत आहे. मात्र आज शनिवारी यामध्ये मोठी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.


