बेळगाव लाईव्ह :खानापूर -हेम्माडगा मार्गावरील मणतुर्गा येथील रेल्वे फाटकाच्या ठिकाणी तयार करण्यात आलेला अंडरपास ब्रिज काल बुधवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
खानापूर -हेम्माडगा रस्त्यावरील मणतुर्गा येथील रेल्वे फाटक बंद करून या ठिकाणी अंडरपास ब्रिज निर्माण करण्यात आला आहे. अंडरपास ब्रिजच्या आतील रस्त्याच्या कामासाठी आणि मुख्य रस्त्याला अंडरपास जोडण्यासाठी गेल्या सुमारे 3 महिन्यांपासून या रस्त्यावरील वाहतूक बंद करून ती असोगा मार्गे वळविण्यात आली होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी अवघ्या दोन महिन्यासाठी वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र कंत्राटदाराच्या वेळ काढूपणामुळे भुयारी मार्गाचे काम पूर्ण होण्यास जवळपास 3 महिन्यांचा कालावधी लागला.

त्यामुळे दरम्यानच्या काळात नागरिकांना आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. तथापि काल बुधवारी हा अंडरपास ब्रिज वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यामुळे हेम्माडगा, शिरोली आदी परिसरातील ग्रामीण भागातील जनतेची सोय झाली असून त्यांच्या समाधान व्यक्त होत आहे.
या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना हेम्माडगा येथील सामाजिक कार्यकर्ते नारायण काटगाळकर म्हणाले की, मणतुर्गा येथील अंडर ब्रिजच्या कामासाठी खानापूर -हेम्माडगा रस्त्यावरील वाहतूक तीन महिने बंद ठेवण्यात आल्यामुळे या भागातील 40 खेडेगावातील गावकऱ्यांची मोठी गैरसोय झाली होती.
वाहतूक अरुंद अशा असोगामार्गे वळविण्यात आल्यामुळे खानापूर -अनमोड दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहन चालक आणि प्रवाशांनाही खराब रस्ता व धुळीचा बराच त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता अंडरपास ब्रिज खुला करण्यात आल्यामुळे सर्वांची गैरसोय दूर झाली असून त्यांना दिलासा मिळाला आहे. या अंडरपास ब्रिजचे काम देखील उत्कृष्ट झाले आहे.
या रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा पाईपलाईनद्वारे नजीकच्या हलात्री नदीत निचरा होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. एकंदर उशिरा का होईना या अंडरपास रस्त्याचे काम उत्कृष्ट झाले असून आता रेल्वे गेटचा अडथळा नसल्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या दूर झाली आहे, असे काटगाळकर यांनी शेवटी सांगितले.