बेळगाव लाईव्ह :मराठा जागृती निर्माण संघातर्फे प. पू. मराठा जगदगुरू वेदांताचार्य श्री श्री श्री मंजूनाथ भारती महास्वामीजी यांच्या सान्निध्यात उद्या बुधवार दि. 14 मे 2025 रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत एक विशेष प्रवचन, सामूहिक महिला भजन व हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पटवर्धन ले-आऊट गार्डन, आदर्श नगर, वडगाव, बेळगाव येथे संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमांद्वारे बेळगावकरांना आध्यात्मिकतेचा जागर, भक्तीमय वातावरण आणि संगीतमय सायंकाळ अनुभवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सायंकाळी 5 ते 6 या वेळेत होणारे स्वामीजींचे “अध्यात्मिक व सामाजिक चिंतन” या विषयावरील प्रबोधनपर प्रवचन होय. ज्यामध्ये ते मानव कल्याण, संस्कृती व समाज उन्नतीसंबंधी चिंतन मांडतील. त्यानंतर सायंकाळी 6 ते 7 या वेळेत शास्त्रीय संगीतातील भजन सादर करण्यात येणार असून त्याला संवादिनीवर चंद्रज्योती देसाई व तबल्यावर कोल्हापूर -कागलचे संदिप डवरी व आकाश सौदागर बेळगाव यांची साथ लाभणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सायंकाळी 4 ते 5 या वेळेत बेळगावातील १५ महिला भजनी मंडळांचे सामूहिक भजन रंगणार आहे. यामध्ये संत मुक्ताई, भक्ती संस्कृती, विठ्ठल रुखमाई, मराठा जागृती निर्माण संघ, जिवेश्वर, श्रीमाताभक्ती, ज्ञानेश्वर, श्रीमंगाई, आदिशक्ती, ब्रम्हलिंग, दत्तदिगंबर, हरी ओम, मोरया, भजनसंध्या आणि रेणुका महिला भजनी मंडळांचा सहभाग असणार आहे. या आध्यात्मिक सोहळ्यास बेळगावचे महापौर मंगेश पवार सन्माननीय उपस्थिती लावणार असून सर्व मराठा बांधव, महिला मंडळं आणि श्रद्धावान नागरिकांना कार्यक्रमांना बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा जागृती निर्माण संघाचे प्रमुख गोपाळराव बिर्जे यांनी केले आहे.
स्वामीजींच्या प्रवचनांतून मिळणारी आध्यात्मिक दिशा, त्यांचं बहुभाषिक ज्ञान, समाजहिताची तळमळ आणि शुद्ध विचारांची गंगा हे सर्व अनुभवण्यासाठी हा कार्यक्रम नक्कीच संस्मरणीय ठरणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, इच्छुक नागरिकांनी वेळेत उपस्थित राहून लाभ घ्यावा, असेही बिर्जे यांनी स्पष्ट केले आहे.