बेळगाव लाईव्ह :गल्लीतील गटारी वेळच्यावेळी स्वच्छ केल्या जात नसल्याच्या निषेधार्थ आणि तुंबलेल्या गटारी तात्काळ स्वच्छ करून सुव्यवस्थित केल्या जाव्यात, या मागणीसाठी उप्पार गल्ली शहापूर येथील संतप्त महिलांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
गल्लीतील तुंबलेल्या गटारींमुळे त्रासलेल्या उप्पार गल्ली शहापूर येथील महिलांनी सादर केलेल्या निवेदनाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या (डीसी) सहाय्यकांनी स्वीकार करून समस्येचे लवकरात लवकर निवारण केले जाईल असे आश्वासन दिले. याप्रसंगी बेळगाव लाईव्ह समोर प्रतिक्रिया व्यक्त करताना उप्पार गल्लीतील शोभा गजानन हजेरी यांनी सांगितले की, आमच्या गल्लीतील गटारी वेळोवेळी व्यवस्थित स्वच्छ केल्या जात नसल्यामुळे सातत्याने तुंबत असतात.
कधीतरी पंधरा दिवसातून एकदा या गटारीची स्वच्छता करून घाण गाळ केरकचरा बाहेर काढला जातो. मात्र त्याची उचल करून विल्हेवाट न लावता तो गटारी कडेलाच टाकून दिला जातो. शहापूर सपार गल्ली व तेग्गीन गल्ली यामधील बोळाचे स्वरूप प्राप्त झालेल्या आमच्या गल्लीतील समस्या जाणण्यासाठी कोणताही लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी फिरकतही नाही.
स्थानिक नगरसेवकाला थांबून विनंती केल्यास ते स्पष्ट नकार देऊन त्या बोळात घराचे बांधकाम सुरू असल्यामुळे गटारी तुंबत आहेत असे उत्तर देऊन हात झटकतात. स्वच्छते अभावी गटारी मोठ्या प्रमाणात सांडपाण्याने तुंबून राहत असल्यामुळे गल्लीतील वातावरण दुर्गंधीयुक्त दूषित झाले आहे. गटारींच्या दुर्गंधीयुक्त दर्पामुळे घरात बसून जेवण करणे कठीण झाले आहे. आमची मुले आजारी पडू लागली आहेत.
महापालिकेचे अधिकारी देखील आमच्या गटारींच्या समस्येची दखल घेण्यास तयार नाहीत. गल्लीतील गटारीचे बांधकाम देखील अर्धवट करण्यात आले आहे. त्याबद्दल जाब विचारल्यास एप्रिलमध्ये काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले होते. आता एप्रिल महिना उलटून गेला तरी गटार बांधकाम अर्धवट अवस्थेतच पडून आहे.
लग्नासाठी स्थळ पाहण्यास येणारी पाहुणेमंडळी तुंबलेल्या गटारी पाहून नाराजी व्यक्त करत आहेत. या कारणास्तव गल्लीतील कांही स्थळांना नकार सहन करावा लागला आहे अशी माहिती देऊन प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना आमच्या उप्पार गल्लीतील गटारी तात्काळ स्वच्छ -सुव्यवस्थित करण्याचा आदेश द्यावा, एवढीच आमची मागणी आहे, असे शोभा हजेरी यांनी शेवटी सांगितले.