बेळगाव लाईव्ह :पहेलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानमधील 9 दहशतवादी केंद्रे जमीनदोस्त केली. याचा शहरात आनंदोत्सव साजरा करण्याबरोबरच सुरक्षा आणि खबरदारीचे उपाय हाती घेण्यात आले आहेत. लष्कराच्या बटालियनचे बेळगावातील मुख्यालय असलेल्या भुईकोट किल्ल्यामध्ये सर्वसामान्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
भारतीय संरक्षण दलाने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान मधील दहशतवाद्यांची केंद्रे असलेल्या 9 ठिकाणांवर हल्ला करून पहेलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. या घटनेनंतर देशभरात विशेष करून संरक्षण दलाच्या विविध विभागांमध्ये ‘अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
बेळगाव शहर परिसरात असलेल्या संरक्षण दलाच्या विविध कार्यालयांमध्ये देखील खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. शहरातील लष्कराच्या बटालियन केंद्र असलेल्या भुईकोट किल्ल्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. किल्ल्यामध्ये ज्यांची घरे आहेत किंवा तेथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात कामानिमित्त ये -जा करणाऱ्या लोकांना त्यांचे ओळखपत्र तपासून किल्ल्यात प्रवेश दिला जात आहे. याव्यतिरिक्त इतर सर्वसामान्य नागरिकांच्या भुईकोट किल्ल्यामधील प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे.
याखेरीज संरक्षण दलाच्या इतर कार्यालय आणि परिसरात सर्वसामान्य नागरिकांच्या विनाकारण संचारास मज्जाव करण्यात येत आहे. संबंधित सर्व कार्यालयांच्या ठिकाणी सशस्त्र बंदोबस्त ठेवण्यात आला असून कॅम्प येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या परिसरात सध्या हातात रायफली घेतलेल्या सशस्त्र जवानांची गस्त सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.
दरम्यान, भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील 9 दहशतवादी केंद्रे जमीनदोस्त करण्याद्वारे पहेलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतल्याबद्दल शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बिलीव्ह फाउंडेशन या संस्थेतर्फे शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे पाकिस्तानातील भारताच्या एअर स्ट्राइक, ऑपरेशन सिंदूरचे मिठाई वाटप करून स्वागत करण्यात आले. खडक गल्लीसह शहरात ठीकठिकाणी फटाक्याची आतषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी मोठ्या संख्येने रस्त्यावर जमलेल्या नागरिक व कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता.