बेळगाव लाईव्ह :बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपूर येथील विनायक संतोष हाजेरी हा अवघा 8 वर्षाचा बालक श्री शिवजयंती उत्सव चित्ररथ मिरवणुकीत दांडपट्टा व लाठी या शिवकालीन मर्दानी खेळाची डोळ्याचे पारणे फेडणारी प्रात्यक्षिके सादर करण्यासाठी खास बेळगाव दाखल झाला आहे.
बेळगाव शहरात दाखल झालेल्या विनायक हाजेरी याने काल बुधवारी रात्री शहापूर बिच्चू गल्ली येथे दांडपट्टा व लाठी फिरवण्याचे आपले कौशल्य मोठ्या सफाईदारपणे सादर करून उपस्थितांची वाहव्वा मिळवली. आता आज गुरुवारी सायंकाळी होणाऱ्या वैभवशाली श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीमध्ये बेळगाव मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव महामंडळाच्या चित्ररथासमोर तो आपली दांडपट्टा आणि लाठी फिरवण्याची डोळ्याचे पारणे फेडणारी प्रात्यक्षिके सादर करणार आहे.
यासाठी मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी प्रयत्न केले आहेत. मुधोळ (जि. बागलकोट) तालुक्यातील महालिंगपूर येथील विनायक संतोष हजेरी हा सध्या इयत्ता दुसरीत शिकत असून शिवजयंती मिरवणुकीतील त्याची प्रात्यक्षिके लक्षवेधी ठरणार आहेत.

शहापूर छ. शिवाजी उद्यान येथे आज गुरुवारी सकाळी त्याने बेळगाव लाईव्ह समोर श्लोकांचे सुस्पष्ट पठण करण्याबरोबरच आत्मसात केलेल्या दांडपट्टा व लाठी फिरवणे या शिवकालीन मर्दानी खेळांची थोडी चुणूकही दाखवली.
याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना विनायकचे वडील संतोष हाजेरी यांनी बेळगाव सारखी भव्य श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणूक अन्यत्र कोठेही पाहायला मिळत नाही त्यामुळे दरवर्षी आम्ही महालिंगपूर होऊन ही मिरवणूक पाहण्यासाठी येत असतो असे सांगितले. माझा मुलगा विनायक हा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून आता लहान वयातच दांडपट्टा व लाठी फिरवण्यात पारंगत झाला आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली देव, देश, धर्माच्या कामासाठी धारातीर्थयात्रा गडकोट मोहिमेमध्ये त्यांने ही आत्मसंरक्षणाची कला तसेच श्लोक वगैरे आत्मसात केले आहे, अशी माहिती हजेरी यांनी पुढे दिली. यावेळी मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी उपस्थित होते.