बेळगाव लाईव्ह : जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली आज बेळगाव येथे जिल्हा विकास समन्वय आणि देखरेख समितीची (केडीपी) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला आणि त्यांना वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. याव्यतिरिक्त, बैठकीत पाणीटंचाईची समस्या आणि आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
पालकमंत्री जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना निर्देश देताना सांगितले की, जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांना प्राधान्य देऊन ती निश्चित वेळेत पूर्ण करावीत. जलजीवन मिशन योजनेंतर्गतची कामे तातडीने पूर्ण करावीत, जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय लवकर उपलब्ध होईल. तसेच, ज्या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या जाणवत आहे, अशा गावांची ओळख पटवून तेथे तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता, पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत बेळगाव शहरात उभारण्यात येणाऱ्या कर्करोग रुग्णालयाच्या जागेवर चर्चा झाली. हे रुग्णालय सध्याच्या बिम्स परिसरामध्येच उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच यासाठी योग्य जागेची निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे सांगण्यात आले. यासोबतच, जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

अपंग व्यक्तींसाठी असलेल्या तीनचाकी वाहनांचे वितरण कोणत्याही परिस्थितीत विलंबाशिवाय पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश बैठकीत देण्यात आले. तसेच, अंगणवाडी केंद्रांना पुरवल्या जाणाऱ्या अन्नाची गुणवत्ता तपासण्याची आणि जिल्ह्यातील रिक्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांची भरती प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची सूचनाही देण्यात आली.
चालू वर्षाच्या एसएससी परीक्षेच्या निकालावर पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आणि शिक्षण विभागाने अधिक मेहनत घेऊन निकालात सुधारणा करण्याचे प्रयत्न करावेत, असे सांगितले. बैठकीत आमदार महांतेश कौजलगी आणि आसिफ सेठ यांनीही विविध विकासकामांच्या प्रगती आणि समस्यांवर आपले विचार मांडले. त्यांनी अनेक विकासकामे वेळेत पूर्ण न झाल्याबद्दल अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आणि कामांना गती देण्याची मागणी केली.
या बैठकीला गॅरंटी योजना अंमलबजावणी प्राधिकरणाचे उपाध्यक्ष एस.आर. पाटील, आमदार विश्वास वैद्य, जिल्हा गॅरंटी अंमलबजावणी प्राधिकरणाचे अध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या अखेरीस, चालू वर्षाच्या एसएससी परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.