बेळगाव लाईव्ह: कर्नाटक सरकारी सेवा नियम अधिनियम 1978 अंतर्गत राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये काम करणाऱ्या पौर कर्मचाऱ्यांना पंचायत राज्य खात्यातील कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्या कर्नाटक राज्य पौर कर्मचारी संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केल्या आहेत.
कर्नाटक राज्य पौर कर्मचारी संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे अध्यक्ष दुंडप्पा रंगन्नावर, उपाध्यक्ष सुखदेव शिंदे आणि सरचिटणीस बसवराज कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे धाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून ते त्वरित मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. निवेदन सादर करण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोठ्या संख्येने जमलेल्या पौर कर्मचाऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धरणे सत्याग्रह केला.
न्यायाची मागणी करणाऱ्या या पौर कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने करत साऱ्यांचे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्र्यांच्या नावे सादर करण्यात आलेल्या निवेदनात सरकारने पंचायत राज्य खात्यातील कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील विविध महापालिका, नगरपालिकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा.
कंत्राटी पद्धतीने स्वच्छतेच्या कामासह पाणी पुरवठा सहाय्यक, वाहन चालक, बागकाम वगैरे कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत थेट सामावून घेतले जावे.
2023 -24 सालामध्ये नियुक्ती झालेले पौरकार्मिक, लोडर्स व क्लीनर्सना एस.एफ.सी. वेतन अनुदानांतर्गत वेतन दिले जावे, वगैरे विविध मागण्यांचा समावेश आहे. यासंदर्भात कर्नाटक राज्य पौर कर्मचारी संघाचे बेळगाव जिल्हा सरचिटणीस बसवराज कांबळे यांनी प्रसिद्धी माध्यमांना अधिक माहिती दिली.