Saturday, December 6, 2025

/

अंडरपासला विरोध नाही पण… स्थानिकांची अशी मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : आगामी 10 मे पासून बेळगाव शहरातील चौथे रेल्वे गेटच्या अंडरपारच्या कामाला सुरुवात होणार आहे या पार्श्वभूमीवर चौथा गेट परिसरातील व्यापाऱ्यांनी आपली भूमिका मांडली आहे आणि प्रशासनाकडे खालील प्रमाणे मागणी केली आहे.

अंडरपास निर्मितीला आमचा येथील कोणाचाही विरोध नाही, मात्र तो करताना येथील दुकानदार, व्यावसायिकांवर गंडांतर येऊ नये यासाठी शेजारी सर्व्हिस रोड 7 मीटरचा ठेवावा, अशी मागणी अनगोळ चौथ्या रेल्वे गेट येथील रहिवाशांसह दुकानदार आणि व्यावसायिकांनी केली आहे.

अनगोळ चौथ्या रेल्वे गेट येथील अंडरपास रस्त्याच्या निर्मितीच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून रेल्वे खात्याकडून नुकतेच या ठिकाणी मोजमाप घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पूर्वीच्या आराखड्यानुसार सदर अंडरपास हा 9 मीटरचा होणार होता. मात्र आता तो 11.5 मीटर इतका केला जाणार आहे. परिणामी सर्व्हिस रोड अरुंद होऊन त्याचा रहदारीसह येथील दुकानदार आणि व्यावसायिकांवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. यासाठी स्थानिक रहिवाशांसह दुकानदार आणि व्यवसायिकांनी 11.5 मी. अंडरपासला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यासाठी आज मंगळवारी सकाळी चौथ्या रेल्वे गेट येथे जमलेल्या दुकानदार, व्यवसायिकांनी स्थानिक माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आवाज उठवला.

 belgaum

याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी सांगितले की, अंडरपास 11.5 मीटर इतका होणार असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. हा रस्ता 80 फुटाचा असून रेल्वे गेट येथील सर्व्हिस रोड फक्त 13 फुटाचा देत आहेत. त्यामुळे रहदारीस अडचण निर्माण होण्याबरोबरच येथील उद्योग धंद्यावर प्रतिकूल परिणाम होणार आहे.

त्यामुळे पूर्वीच्या आराखड्याप्रमाणे 9 मीटरचा अंडरपास करून सर्व्हिस रोड 5 ते 7 मीटरचा करावा जेणेकरून येथील दुकानदार व्यावसायिक आणि रहिवाशांच्या रहदारीची चांगली सोय होईल. सदर अंडरपासची सखलता साधारण 300 मीटर इतकी ठरवण्यात आली आहे. तेंव्हा या अंडरपासशी संलग्न सर्व्हिस रोडची रुंदी 7 मीटर असावी अशी आमची मागणी आहे.

याची रेल्वे खाते आणि महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घेऊन त्या पद्धतीने अभ्यास करून अंडरपास बांधकामाची कार्यवाही करावी अशी आमची विनंती आहे. एकंदर सर्व्हिस रोड करताना या ठिकाणच्या कोणत्याही दुकानदार, व्यापारी अथवा व्यवसायिकावर गंडांतर येऊ नये याची दक्षता घेतली जावी. अंडरपास निर्मितीला आमचा येथील कोणाचाही विरोध नाही, मात्र तो करताना आम्हा सर्वांना विश्वासात घेतले जावे एवढीच अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे या चौथ्या रेल्वे गेट रेल्वे मार्गाला समांतर असा तिसऱ्या रेल्वे गेट पर्यंतचा जो रस्ता आहे तो सर्व्हिस रोडला आणि तिसऱ्या रेल्वे गेट येथील उड्डाण पुराच्या रस्त्याला जोडल्यास अतिशय उत्तम होणार आहे. कारण त्यामुळे अनगोळ मुख्य रस्त्यावरील रहदारीचा ताण कमी होऊन या भागातील रहदारीला उद्यमबाग परिसरात ये-जा करण्यासाठी सोयीचे ठरेल असे मत व्यक्त करून एकंदर व्यवस्थित सर्वेक्षण करून अनगोळ चौथ्या रेल्वे गेट येथील अंडरपासची अंमलबजावणी केली जावी असे आम्हा सर्वांना वाटते, असे माजी नगरसेवक अभियंता विनायक गुंजटकर यांनी शेवटी सांगितले.

यावेळी उपस्थित नाराज व्यावसायिक व दुकानदारांनी देखील आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करून अंडरपासचा सर्व्हिस रोड हा 7 मीटरचा झाला पाहिजे अशी मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.