बेळगाव लाईव्ह :बेळगाव जुन्या न्यायालय आवारातील वाळलेला एक मोठा वृक्ष कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता असून वन खात्याने याकडे लक्ष देऊन सदर धोकादायक वृक्ष तात्काळ हटवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
एलआयसी कार्यालयाजवळ हमरस्त्याशेजारी बेळगावच्या जुन्या न्यायालय आवारात असलेला एक मोठा वृक्ष पूर्णपणे वाळून गेला आहे. पूर्वीपासून या वृक्षाच्या ठिकाणीच वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
त्यामुळे सध्याचा पाऊस व सोसायटीच्या वाऱ्यामुळे सदर वाळलेला धोकादायक वृक्ष दिवसाढवळ्या कोसळल्यास दुर्घटना घडण्याची अथवा वाहनांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तरी वन खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर वृक्ष तात्काळ हटवावा, अशी मागणी जागरूक वकील ॲड. मारुती कामाण्णाचे यांच्यासह इतर वकिलांनी केली.