बेळगाव लाईव्ह :मागील 8 -10 दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे राजहंसगड परिसरात पेरणी हंगामाला सुरवात झाली असून भात तसेच भुईमूग, शेंगा व सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे.
वळीवाने दडी मारल्याने राजहंसगड परिसरातील शेकऱ्यांना पुरेशी मशागत करता आली नव्हती. अशातच मागील आठवडाभरापासून सतत सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली होती. मात्र दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने पेरणी हंगामाला सुरवात झाली असून शेतकऱ्याना थोडासा दिलासा मिळाला आहे.
सध्या भात पेरणी ,भुईमूग शेंगा, सोयाबीन पेरणी तसेच रताळी लागवडीसाठी म्हेरा तयार करण्याचे काम सुरू आहे. राजहंसगड परिसराला यंदा अवकाळी पाऊसाचा चांगलाच फटका बसला आहे. अवकाळी पावसाने दगा दिल्यामुळे शेतीची, मशागतीची कामे थांबली होती. आता संततधार पाऊस सुरू झाल्यामुळे यंदा शिवार तयार करायला वेळच मिळाला नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकरी बांधवांना मोठा फटका बसला आहे.

दरम्यान बेळगाव तालुकासह जिल्ह्यामध्ये यंदा मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. परिणामी अनेक भागात शिवारात पाणी साचून पेरणीपूर्व मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. कांही भागात केली जाणारी धूळवाफ पेरणी झालेली नाही.
परिणामी शेतकऱ्यांना पावसाच्या उसंतीची प्रतीक्षा लागून राहिली असून काही भागात पावसाळी हंगामातील कामांना गती देण्यात आली आहे. एकंदर मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार हजेरीमुळे नियमित पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे गणित कोलमडले आहे.


