बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिका कार्यक्षेत्रात असलेल्या होलसेल फळ मार्केट मध्ये चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे स्मार्ट बेळगाव असणाऱ्या मनपा प्रशासनाने फ्रुट मार्केट असोसिएशनने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्यामुळे गांधीनगर येथील होलसेल फ्रुट मार्केट दिवसेंदिवस अस्वच्छतेचे माहेरघर बनत चालले आहे. याकडे महापालिकेसह फ्रुट मार्केट संघटनेने गांभीर्याने लक्ष देऊन मार्केटमध्ये स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याची मागणी त्रस्त जागरूक ग्राहकांमधून केली जात आहे. मागील 10 वर्षांपूर्वी या फळ मार्केटमध्ये रस्ता निर्माण करण्यात आला होता सध्या इथल्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे सध्याच्या फ्रुट मार्केट असोसिएशनने याकडे साप दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
भाजीपाला अथवा फळे ही नाशवंत असल्यामुळे त्यांच्या बाजारपेठेमध्ये पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने सातत्याने स्वच्छता राखली जाणे अत्यावश्यक असते. तथापी बेळगावच्या गांधीनगर येथील होलसेल फ्रुट मार्केट अर्थात होलसेल फळांची बाजारपेठेत अलीकडे परिसर स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सध्या या मार्केटमध्ये ठीकठिकाणी खराब किंवा खाऊन टाकलेली फळे, गवत आणि इतर टाकाऊ वस्तूंचा कचरा साचून राहिलेला पहावयास मिळतो अशा परिस्थितीत फ्रुट मार्केट असोसिएशन याकडे का दुर्लक्ष करत आहे असाही प्रश्न विचारला जात आहे.

एकंदर मार्केटमध्ये सर्वत्र अस्वच्छतेचे वातावरण पसरलेले असते. सध्या पावसामुळे तर दलदल निर्माण होऊन या अस्वच्छतेमध्ये आणखीनच भर पडली आहे. या अस्वच्छतेचा परिणाम येथे उघड्यावर विक्रीसाठी ठेवलेल्या फळांवर आणि पर्यायाने ग्राहकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फ्रुट मार्केटमधील वाढत्या अस्वच्छतेमुळे फळे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील कमी होऊ लागली आहे असाही आरोप होऊ लागला आहे.
सदर फ्रुट मार्केटच्या ठिकाणच्या स्वच्छतेची काळजी घेतली जात होती. तशी काळजी सध्याच्या विद्यमान व्यापारी संघटनेने घेणे अपेक्षित आहे फ्रुट मार्केट झोपली आहे का? इतका चिखल झाला तरी गप्प का आहेत प्रश्न उपस्थित होत असून फ्रुट मार्केट संघटनेने विद्यमान लोकप्रतिनिधी आणि महापालिकेकडे स्वच्छता करण्याची मागणी देखील करण्याची गरज व्यक्त होत आहे.
आता पावसाळ्याला सुरुवात होत आहे तेव्हा आता तरी फ्रुट मार्केट व्यापारी संघटनेने जागे होऊन आपल्या मार्केटमध्ये स्वच्छता राखली जाईल या दृष्टीने कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे बेळगाव महापालिकेच्या स्वच्छता विभागाने देखील साचणाऱ्या कचऱ्यामुळे दयनीय स्थिती झालेल्या होलसेल फ्रुट मार्केटकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि वेळच्यावेळी तेथील कचरा स्वच्छ करावा, अशी जोरदार मागणी त्रस्त जागरूक ग्राहकांमधून केली जात आहे.


